वॉश्गिंटन – अमेरिकेचे राष्ट्रपती भवन व्हाइट हाऊस सध्या कोरोना व्हायरसच्या जाळ्यात सापडलं आहे. याठिकाणी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पैंस यांच्या नजीकच्या काही सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हाइट हाऊसमध्ये कामाला जाण्यास भीती वाटत आहे असं राष्ट्राध्यक्षाच्या सहकाऱ्याने सांगितले आहे.
कोरोना व्हायरस टास्क फोर्सचे सदस्य ज्यात सीडीसी आणि एफडीएचे प्रमुखही सहभागी आहेत. त्यांना स्वत:ला क्वारंटाईन करावं लागलं आहे. हे लोक अशा व्यक्तीच्या संपर्कात आले ज्याच्यात कोरोनाचे लक्षण आढळले नाहीत तरीही कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तसेच मिलिटरी जनरलचे टॉपचे २ अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्याचसोबत सेनेट हेल्थ कमिटीचा एक कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा सर्व धोका असतानाही नेतृत्वाकडून लवकरात लवकर उद्योगधंदे सुरु करावेत आणि अर्थव्यवस्था उभारावी असा दबाव टाकण्यात येत आहे. यामुळे कोरोना संक्रमणात वाढ होऊ शकते. मात्र ट्रम्प यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून या परिस्थितीत सुधारणा होत असल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेत रविवारपर्यंत ८० हजार कोरोना रुग्ण दगावले आहेत. जगात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये दर तिसरा व्यक्ती अमेरिकेचा आहे. रविवारी प्रतिदिन होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी आढळले. एक एप्रिलनंतर पहिल्यांदाच अमेरिकेत प्रतिदिन एक हजारांच्या खाली मृतांचा आकडा आला. मात्र अमेरिकेने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला तर ऑगस्टपर्यंत मृतांची संख्या वाढून १ लाख ३५ हजारपर्यंत पोहचू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चीनकडे पाहिलं तर वुहान शहरात ज्याठिकाणाहून कोरोनाचा फैलाव जगभरात झाला तेथे कोरोना रुग्ण सापडणे बंद झाल्यानंतर लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा वुहानमध्ये कोरोना महामारीचा परिणाम पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत अमेरिकेने अर्थव्यवस्था उभारणीसाठी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय केला तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी केविन हैजेट यांनी त्यांना कामाला जाण्याचीही भीती वाटते असं एका कार्यक्रमात म्हटलं आहे. इतकचं नाही तर नॅशनल गार्ड ब्यूरोचे चीफ जोसेफ लेंग्येल आणि नौदलाचे टॉप एडमिरल माइकल गिल्डाव यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.