बीजिंग : चीनमधील डुकरांमध्ये आढळून येणारे जी ४ विषाणू माणसांमध्ये संक्रमित होतात. मात्र याचा माणसाकडून माणसाला संसर्ग होण्याचे उदाहरण अद्याप आढळलेले नाही. त्यामुळे त्याची मोठी साथ पसरण्याचा धोका नाही असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
चीनमध्ये २०११ ते २०१८ या कालावधीत डुकरांवर केलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष पीएनएएस या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. इंफ्लूएन्झा तापाच्या विषाणूशी साधर्म्य असलेले जी ४ प्रकारचे विषाणू डुकरांमध्ये आढळून आले. माणसांमध्ये त्यांचा संसर्ग झाल्यास श्वसनयंत्रणेचे विकार उद्भवू शकतात असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
कोरोना साथीचा प्रसार रोखण्यासाठी चीनने परिणामकारक उपाययोजना केली नाही तसेच साथीबाबत जगाला आगाऊ सूचना दिली नाही असा आरोप अमेरिका व इतर देशांनी केला होता. हा विषाणू प्राण्यातून माणसामध्ये संक्रमित झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे चीनमधील विषाणूसंदर्भातील स्थिती व संशोधनावर आता साऱ्या जगाचे लक्ष केंद्रित झाले आहे.