माद्रिद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जग सध्या संकटात सापडलेले आहे. भारतासह इतर काही देशांत कोरोनामुळे सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र दुसरीकडे जिथे काही दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले होते अशा देशांमध्ये कोरोना आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये स्पेनचाही समावेश होता. मात्र स्पेनने आता कोरोनावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून, तिथे गेल्या आठवडाभरापासून एकही मृत्यू नोंदवला गेलेला नाही.
स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने हल्लीच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यंची नोंद करण्याची पद्धत बदलली आहे. त्यानंतर ७ जूनपासून या देशात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. मात्र तज्ज्ञांकडून स्पेन सरकारच्या या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. स्पेनमध्ये ७ जूनपर्यंत २७ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर आतापर्यंत तिथे २ लाख ९१ हजार ००८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
भारत आणि स्पेनमध्ये एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. नंतर स्पेनमध्ये कोरोनाने गंभीर रूप घेतले होते. त्यामुळे तिथे दररोज शेकडो जणांचे मृत्यू होत होते. दरम्यान, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सरकारच्या नव्या धोरणामुळे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा नियंत्रणात आल्याचे स्पेनमधील आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र प्रादेशिक आकडे मिळत नसल्याने कोरोनामुळे होत असलेल्या मृत्यूंचा आकडा अपडेट करण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी मान्य केले.