टोकियो: कोरोनामुळे जगभरात हाहाकार माजला असून, अनेक देश प्रभावित झाले आहेत. इटली, अमेरिका आणि स्पेनला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही लस उपलब्ध न झाल्यानं मृतांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वच देशांना या समस्येवर कसं नियंत्रण मिळवायचं हा प्रश्न भेडसावत आहे. अनेक देशातील नागरिक लॉकडाऊनचं काटेकोर पालन करत नाहीत. जपानमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच तिथले पंतप्रधान शिंजो अबे यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. जपानमध्ये कसा झाला कोरोनाचा प्रादुर्भाव?चीनच्या वुहान प्रांतात नोव्हेंबर २०१९मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. जानेवारीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. चीनमधून निघालेल्या डायमंड प्रिन्सेस जहाजावर २५०० पेक्षा जास्त नागरिक प्रवास करत होते आणि त्याच जहाजावर कोरोनाचे रुग्ण असल्याची बातमी आल्यानं तेव्हा जपानमध्ये एकच खळबळ उडाली. ते जहाज जपानमध्ये थांबविण्यात आल्यानंतर त्यांच्यातील कोरोनाबाधित रुग्णांना वेगळं करून त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू करण्यात आले होते. तिथूनच जपानमध्ये कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाली. जपानी जनता आहे शिस्तप्रिय?जपानी नागरिक शिस्तीचं पालन करतात. जपानमध्ये मध्यरात्रीसुद्धा नागरिक रस्त्यांवरील सिग्नल तोडत नाहीत. तसेच जपानी नागरिक हे परावलंबी नसल्यानं स्वतःची कामं स्वतःचा करतात, त्यामुळे त्यांच्याकडे नोकर वगैरे जास्त करून नसतात. तसेच जपानमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तिथे अस्वच्छता खपवून घेतली जात नाही. लहान मुलांना सुट्टीच्या दिवशीही उद्यानांमध्ये सफाई कशी करतात, याचं प्रशिक्षण दिलं जातं. देशातील सरकारच्या प्रत्येक नियमांचे पालन जपानी नागरिक करतात.जपानी नागरिक सहसा एकत्रित येऊन चावडीवर गप्पागोष्टी करत बसत नाहीत. तसेच ते एकमेकांना कामाव्यतिरिक्तही फार भेटतही नाहीत. त्याचा फायदा जपानला झाला आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात जपानी लोकही रस्त्यावर हातमोजे आणि मास्क घातलेले दिसतात. जपानमध्ये स्वच्छता आणि आरोग्याला जास्त महत्त्व दिलं जात असल्यानंच या देशानं कोरोनावर मात करण्यात यश मिळवलेलं आहे.
CoronaVirus: ...म्हणून पूर्णतः लॉकडाऊन नसतानाही जपानला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 4:46 PM