मुंबई - जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सध्या युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. दरम्यान, डायबिटिस असलेल्या व्यक्तींना कोरोनाच्या संसर्गामुळे अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झालेल्या डायबिटीसच्या रुग्णांमधील मृत्युदर हा तब्बल ४२ टक्के असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मात्र डायबिटिसच्या रुग्णांनाही कोरोनाच्या संसर्गातून वाचवणे शक्य असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत तज्ज्ञांनी सांगितले की, ज्या व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त आहेत, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर अशा परिस्थितीत आतापर्यंत ४२ टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र या मृत्यूंचे कारण कोरोना नव्हे तर शुगरचे वाढलेले प्रमाण ठरले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या बहुतांश डायबिटिसच्या रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे वेस्टर्न केप हेल्थच्या संशोधकांनी म्हटले आहे. हे आकडे परदेशातील असले तरी भारतातही परिस्थिती चांगली असल्याची अपेक्षा बागळता येण्यासारखे चित्र नाही. जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा अधिक डायबिटिसचे रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी कोरोनाच्या संक्रमण काळात विशेष खबरदारी घेण्याची गरज आङे. तसेच कुठलीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
डायबिटीसच्या ज्या रुग्णांनी सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संसर्गाकडे लक्ष दिले नाही. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. जर या लोकांनी वेळीच संसर्गाकडे लक्ष दिले असते आणि वेळीच डॉक्टरकडे गेले असते तर त्यांची शुगर धोकादायक पातळीपर्यंत जाण्यापासून रोखता आले असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.