न्यूयॉर्क - अमेरिका आणि यूरोपमध्ये कोरोनाचे थैमान सुरूच असून, जगभरातही कोरोनाबधितांचा आकडा सातत्याने वाढत चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या फैलावासमोर अमेरिका आणि यूरोपीय देश हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत 42 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच संपूर्ण जगात कोरोनाबधितांचा संख्या साडेआठ लाखांच्या पुढे पोहोचली आहे.
अमेरिकेत काल एका दिवसात 865 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत 3860 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका इटली आणि स्पेननंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 87 हजार 347 पर्यंत पोहोचली आहे.
कोरोनामुळे इटली, स्पेनसह इतर युरोपियन देशातही भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशांमधील कोरोनाबधितांची संख्या वेगाने वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या इटलीमध्ये कालही मृत्यूचे थैमान सुरू राहिले. इटलीत मृतांचा आकडा 12 हजार 428 वर पोहोचला आहे. इटलीत गेल्या 24 तासांत 837 जणांचा मृत्यू झाला आहे.
स्पेनमध्ये कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 748 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमधील आतापर्यंत 8 हजार 500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच स्पेनमध्ये कोरोनाग्रस्थांचा आकडा 95 हजार 923 वर पोहोचला आहे. तर फ्रान्समध्ये 3523, इंग्लंडमध्ये 1789 जणांचा मृत्यू झाला आहे. आशियाई देशांचा विचार केल्यास इराणमध्ये कोरोनाग्रस्थांचा आकडा वेगाने वाढत आहे. इराणमध्ये आतापर्यंत 3110 हुन अधिक जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.