इस्लामाबाद - सध्या भारतात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे भारताचा शेजारी असलेल्या पाकिस्तानमध्येही कोरोना बेलगाम झाला आहे. येथे कोरोनाच्या संसर्गाने वेग घेतला असून, गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनाचे ६ हजार ४०० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सव्वा लाखाच्या पार पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानात कोरोनामुळे १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २५००च्या जवळ पोहोचली आहे.
पाकिस्तानमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या सव्वा लाख रुग्णांपैकी सुमारे चाळीस हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. पाकिस्तानमध्ये पंजाब आणि सिंध या प्रांतांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये १५०० हून अधिक रुग्णांची नोंद झाली. आहे.
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असला तरी येथे कोरोनाच्या चाचण्या मात्र म्हणाव्या तशा वेगाने होत नाही आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत सुमारे आठ लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत. तर दररोज २५ हजार चाचण्या होत आहेत.
अर्थव्यवस्थेचा विचार करून पाकिस्तानमध्ये संपूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात आले नव्हते. प्रांतीय सरकारांनी आपल्या सोईप्रमाणे लॉकडाऊन लागू केले होते. मात्र केंद्रीय सरकारने तसे करण्यास नकार दिला होता. तरीही कोरोनामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या काळात सुमारे तीन ट्रिलीयन डॉलर एवढे नुकसान झाल्याचा पाकिस्तान सरकारचा दावा आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्यात आले असून, लॉकडाऊन हटवल्यापासून तेथील कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ झाली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या