जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिलेल्या माहितीनुसार, यूरोपात गेल्या आठवड्यात 20 लाख हून अधिक कोरोना रुग्ण समोर आले. ही एका आठवड्यात युरोपात कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरू झाल्यानंतर आलेली सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. एवढेच नाही, तर कोरोना मुळे 27,000 जणांचा मृत्यूही झाला आहे. गेल्या आठवड्यात संपूर्ण जगात झालेल्या मृत्यूच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे.
विशेष म्हणजे, पूर्व युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरण कमी झाले आहे, तेथे कोरोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच, पश्चिम युरोपातील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे, तेथेही कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अर्थात, युरोप पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे केंद्र बनत असल्याचे दिसत आहे. यामुळे आता, अनेक युरोपीय देशांनी पुन्हा एकदा कोरोना संदर्भातील बंधने लादण्यास सुरुवात केली आहे.
ज्यांना आवश्यकतच नाही अशा कुणाला लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल -वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आपल्या ब्रीफिंगमध्ये म्हटले आहे की, स्वस्थ्य लोकांना आणि मुलांनाही कोरोनाचा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता नाही. कारण आजही जगातील अनेक देशांमध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध आणि उच्च जोखीम असलेल्या श्रेणीतील लोकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. जर, ज्यांना आवश्यकतच नाही, अशा कुणालाही लस दुसऱ्यांदा टोचली गेली तर, तो घोटाळा ठरेल. हा घोटाळा रोखण्याची आवश्यकता आहे.
अनेक प्रकारच्या लसीकरण कार्यक्रमांवरही कोरोनाचा परिणाम -50 कोटी कोव्हॅक्स लस 144 देशांमध्ये पोहोचली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे आमचे लक्ष्य आहे. यासाठी येत्या 10 दिवसांत एकूण 55 कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. WHO च्या या ब्रीफिंगमध्ये आणखी एक गोष्ट सांगितली गेली की, गेल्या वर्षी 22 मिलियनहून अधिक मुलांना गोवरची लस मिळू शकली नाही. एकूणच, जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले, की अनेक प्रकारच्या लसीकरण कार्यक्रमांवरही कोरोनाचा परिणाम झाला आहे.