ब्रिटन : जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातच आता ब्रिटनमधून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. येथील एका पाळीव कुत्र्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ब्रिटनच्या मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. दरम्यान, यापूर्वी जगातील विविध देशांमध्ये इतर प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
मुख्य पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ३ नोव्हेंबर रोजी वेब्रिज येथील प्राणी आणि वनस्पती आरोग्य संस्थेच्या प्रयोगशाळेत झालेल्या चाचण्यांनंतर कोरोना संसर्गाची पुष्टी झाली. सध्या या कुत्र्यावर घरीच उपचार केले जात असून प्रकृती सुधारत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कुत्र्याला कोरोना होण्याआधी त्याच्या मालकाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, कुत्र्याला त्याच्या मालकामुळे संसर्ग झाला की इतर कोणत्या प्राण्यापासून याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी क्रिस्टीन मिडलमिस यांनी निवेदनात म्हटले आहे की, कुत्र्यांना संसर्ग होणे अत्यंत दुर्मीळ बाबा आहे. सर्वसामान्यपणे फक्त सौम्य क्लिनिकल लक्षणे दिसतात आणि काही दिवसात बरे होतात. आता याचा कोणताही पुरावा नाही की, पाळीव प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण थेट माणसांकडून झाली. सध्या कुत्र्यावर देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
याचबरोबर, आणखी एक वैद्यकीय अधिकारी कॅथरीन रसेल यांनी म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेनुसार या प्रकरणाची नोंद जागतिक प्राणी आरोग्य संघटनेला करण्यात आली आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील इतर देशांमध्ये पाळीव प्राण्यांमध्ये फारच कमी प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
दरम्यान, प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रकार समोर आल्यानंतर जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. कारण सध्या फक्त मानवासाठी कोरोना लस तयार करण्यात आली आहे. प्राण्यांसाठी तरी लस उपलब्ध नाही. त्यातच पाळीव कुत्र्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग हा धोकादायक ठरू शकतो.