बीजिंग - चीनमध्येकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 106 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1300 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. देशात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली स्थिती गंभीर असल्याची कबुली अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे. या व्हायरसमुळे पसरलेल्या आजाराविरुद्ध सुरू असलेली लढाई आम्ही जिंकूच, असेही ते ठामपणे म्हणाले. दरम्यान चीनमध्ये या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
कोरोना व्हायरस दिवसेंदिवस चीनमध्ये पसरत असून अनेक जण या आजाराचा शिकार होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आजाराचं कोणतंही लक्षण लगेच आढळून येत नाही. हा आजार इतका धोकादायक आहे की, वुहानमध्ये लोकांना स्वत:ला घरात कैद करुन ठेवलं आहे. शहरात कोणालाही मुक्त फिरण्याची परवानगी नाही. इतकचं काय तर पेइचिंगमध्ये लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन करू नये असंही बजावण्यात आलं आहे. चीनच्या नववर्षानंतर शाळा-कॉलेज सुरू होणार होते. मात्र त्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे राष्ट्रीय पातळीवर पसरलेल्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने वन्यप्राण्यांच्या व्यापारावर तात्पुरती बंदी आणली आहे. चीनमध्ये अन्न म्हणून वन्य प्राण्यांच्या मांसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळविण्यात येईपर्यंत सर्व वन्यप्राण्यांची विक्री आणि वाहतुकीवर बंदी राहणार असल्याचे सरकारने एका आदेशात म्हटले आहे. चीनच्या कृषी मंत्रालय, व्यापार नियमन प्रशासन आणि राष्ट्रीय वन आणि वन्यभूमी प्रशासनाने ही बंदी आणली.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे. रुग्णालय उभारण्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसची लागण हळूहळू जगभरात होत आहे. हाँगकाँग, मकाऊ,तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह अमेरिकेत रुग्ण आढळले असून शुक्रवारी जपानमध्ये रुग्णाची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्दी- पडसे होऊन या आजाराची लागण होते. सिव्हियर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोममुळे (सार्स) रुग्ण दगावतो. कॅनाडामधील एका रुग्णालयात कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण दाखल झाला असून त्याबाबत अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे
कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे
एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा सरकार विकणार; टाटा, हिंदुजा, स्पाइसजेट, इंडिगोला स्वारस्य