जिनिव्हा - जगभरात ४३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ३ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगाला कोरोना विषाणूच्या नवीन लक्षणांबद्दल इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओच्या तज्ज्ञांनी सांगितले की, बोलण्यात येत असलेली अडचण म्हणजे कोरोना व्हायरसचे एक गंभीर लक्षण आहे. आतापर्यंत जगभरातील डॉक्टर केवळ खोकला किंवा ताप ही कोरोना विषाणूची दोन मुख्य लक्षणे आहेत असं सांगत होते.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा दावा आहे की, इतर लक्षणांसह त्यांना बोलण्यात अडचण येणे ही कोरोना विषाणूची लागण होण्याचे एक संभाव्य लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीला बोलण्यात तसेच चालण्यात त्रास होत असेल तर त्याने त्वरित डॉक्टरांना भेटावे असं डब्ल्यूएचओ तज्ञांनी सांगितले आहे.
डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, कोरोना विषाणूमुळे ग्रस्त बहुतेक लोकांना श्वासोच्छवासाची हलकी समस्या असू शकते आणि विशिष्ट उपचारांशिवाय ते बरे होतील. कोरोना विषाणूच्या गंभीर लक्षणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे येणे, बोलणे किंवा चालण्यात अडचण येणे हीदेखील कोरोना विषाणूची गंभीर लक्षणे समाविष्ट आहेत.
त्यामुळे जर एखाद्याला अशी गंभीर समस्या येत असेल तर त्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. कृपया डॉक्टरकडे जाण्यापूर्वी एकदा हेल्पलाइनचा सल्ला घ्यावा. बोलण्यात अडचण नेहमीच कोरोना विषाणूचे लक्षण नसते. कधीकधी इतर कारणांमुळे बोलण्यास त्रास येतो. या आठवड्यात झालेल्या आणखी एका संशोधनात असं म्हटले गेले की कोरोना विषाणूचे आणखी एक लक्षण म्हणजे सायकोसिस(मनोविकृती) देखील आहे असा तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मेलबर्नमधील ला ट्रॉब युनिव्हर्सिटीने असा इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूमुळे बर्याच रुग्णांना मानसिक आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे, कोरोना विषाणू प्रत्येकासाठी एक अत्यंत तणावपूर्ण अनुभव आहे. हे आयसोलेशन दरम्यान वाढत आहे. अभ्यास पथकाने मार्स व सार्ससारख्या इतर विषाणूंविषयीही अभ्यास केला आणि ते मनुष्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करीत आहेत की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असं डॉक्टर एली ब्राऊन यांनी सांगितले.