कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असताना सोशल मीडियावर अनेक चुकीचा संदेश देणारे मेसेज शेअर केले जात आहे. एखाद्या मेसेजबाबत कोणतीही पडताळणी न करता तो तसाच दुसऱ्यांना पाठवला जातो. सध्या असाच एक मेसेज आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक दाम्पत्य दिसत असून ते इटलीमधीलडॉक्टर असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या फोटोसोबत एक भावनिक मेसेज देखील लिहण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमधये असं लिहण्यात आले आहे की, इटलीमधील हे दोघे डॉक्टर आहेत आणि दोघेही दिवसरात्र कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा केली. मात्र 8 व्या दिवशी त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र काही दिवसांनंतर दोघांना असं समजले की आता जास्त वेळ आपल्याकडे नाही. आपण जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही अशी जाणिव त्यांना झाल्यावर ते दोघं एकमेकांना भेटण्याची विनंती करतात. त्यानंतर दोघंजण रुग्णालयातील परिसरात भेटून एकमेकांसोबत वेळ घालवतात. यानंतर दोघांचाही मृत्यू होतो असा दावा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये केला आहे.
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या फोटोबद्दल अधिक माहिती शोधत असताना इटलीतील नसून स्पेनमधील असल्याचं समोर आलं आहे. स्पेनच्या बार्सिलोना विमानतळावर हा फोटो काढण्यात आला आहे. या दाम्पत्याचा फोटो काढणाऱ्या एमिलो मेरेनट्टी यांनी सांगितले की, 12 मार्च 2020 ला बार्सिलोना इथं स्पेनच्या विमानतळावर एकमेकांचा किस घेत या जोडप्याचा फोटो काढला होता. तसेच राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपातून अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना निर्बंध घातल्याची घोषणा केल्यानंतर हा फोटो टिपण्यात आल्याची माहिती एमिलो यांनी ट्विटरवर दिली होती. या जोडप्याबद्दल मलाही काही कल्पना नसल्याचे एमिलो मेरेनट्टी यांनी सांगितले.