वॉशिंग्टन : नोकरी अथवा वास्तव्यासाठी परदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्याचा कायदेशीर मार्ग (इमिग्रेशन) स्थगित करण्यात येणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री केली. सध्याचे कोरोना संकट टळल्यानंतर अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणली जाईल, तेव्हा जास्तीत जास्त रोजगार अमेरिकी नागरिकांनाच मिळावेत, याची खात्री करण्यासाठी ट्रम्प प्रशासन हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे कळते.ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले की, ‘अदृश्य शत्रूकडून झालेला हल्ला लक्षात घेऊन, तसेच आपल्या महान अमेरिकी नागरिकांच्या रोजगारांचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्यांचे इमिग्रेशन तात्पुरते तहकूब ठेवण्याचा प्रशासकीय आदेश मी काढणार आहे.’ असा आदेश केव्हा काढला जाईल व त्याचे स्वरूप नेमके कसे असेल, याचे कोणतेही संकेत ट्रम्प यांनी दिले नाहीत; पण असा आदेश येत्या काही दिवसांत काढला जाईल व त्यात नोकरीसाठीचे व्हिसा व ‘ग्रीन कार्ड’ या दोन्हींचा समावेश असेल, असे माहीतगारांना वाटते.ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचे कट्टर पुरस्कर्ते असून, अमेरिकी उद्योग व नागरिकांना परकीय उद्योग व स्थलांतरितांपासून जास्तीत जास्त संरक्षण देणे हा त्यांच्या धोरणाचाच भाग आहे. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत त्यासाठी अनेक पावलेही टाकली आहेत. एरवीही ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम अधिक कडक व संकुचित केले आहेत. परिणामी, अमेरिकेने परदेशी नागरिकांना दिलेल्या व्हिसांची संख्या सन २०१६ मधील ६.१७ लाखांवरून गेल्या वर्षी ४.६२ लाख, अशी सुमारे २५ टक्क्यांंनी घटली आहे.आता कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या अर्र्थव्यवस्थेचे निमित्त पुढे करून हे धोरण अधिक कडक केले जाईल, असे दिसते. कोरोना आणि ‘लॉकडाऊन’मुळे अमेरिकेत २.२ कोटी नागरिकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून, त्यांनी बेरोजगारांना मदत देण्याच्या सरकारी योजनेसाठी अर्ज केले आहेत.नोकरी व वास्तव्यासाठी कायदेशीर मार्गाने येणाऱ्यांखेरीज हजारो लोकांचे बेकायदा स्थलांतर ही अमेरिकेची नेहमीचीच समस्या आहे. देशात आलेल्या बेकायदा स्थलांतरितांना हुडकून देशाबाहेर काढणे हे निरंतर चालणारे काम आहे. आता कोरोना महामारी सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी देशाची उत्तर व दक्षिण सीमा पूर्णपणे ‘सील’ केली आहे.‘एच-१ बी’वरही गदा येणार?भारतीयांच्या दृष्टीने फक्त नोकरीसाठी दिला जाणारा ‘एच-१ बी’ व्हिसा हा सर्वाधिक लोकप्रिय आहे. खासकरून अमेरिकेतील आयटी उद्योगात या व्हिसावर सध्या काही लाख भारतीय नोकरी करीत आहेत. ‘एच-१बी’ हा ‘नॉन इमिग्रंट’ म्हणजे स्थलांतरासाठी नसलेला व्हिसा आहे.ट्रम्प यांनी ‘इमिग्रेशन’ स्थगित करण्याचे टष्ट्वीट करताना अमेरिकी नागरिकांच्या नोकºयांचे रक्षण करणे हे कारण स्पष्टपणे नमूद केल्याने या ‘एच-१बी’ व्हिसावरही अधिक कडक बंधने येतील, असे दिसते.गेल्याच आठवड्यात ट्रम्प प्रशासनाने मुदत संपलेल्या किंवा संपत आलेल्या ‘एच-१बी’ व्हिसाधारकांना अमेरिकेत राहण्याची मुभा दिली होती. ते लक्षात घेता ट्रम्प यांची नवी घोषणा या व्हिसाधारकांना संभ्रमात टाकणारी आहे.
CoronaVirus: नोकरी, वास्तव्यासाठी अमेरिकेचे दरवाजे बंद?; इमिग्रेशन स्थगितीची ट्रम्प यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 2:01 AM