वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनामुळे अमेरिकेतील परिस्थिती सुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांता दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर (WHO) गंभीर आरोप केले आहेत. जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप आहे. अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्यात येणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणत आहोत."
दरम्यान, अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बारा हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत ८१ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. स्वीडनमध्ये २० तासांत १०० हून जास्त कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे.