- सुभाषचंद्र वाघोलीकर, लोकमत औरंगाबादचे माजी संपादकजगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूचे नवनवे कारनामे उजेडात येत आहेत. कोरोनाची लागण ओळखण्याची तीन-चार लक्षणे सरकारने प्रत्येकाकडून घोकून घेतल्यानंतर आता असे लक्षात आले आहे की, ही कोणतीच लक्षणे दिसत नसलेला वरकरणी धडधाकट माणूससुद्धा कोरानाबाधित असू शकतो. किंबहुना अशा चोरमार्गी लागणीचेच प्रमाण जास्त आहे.महाराष्ट्रामध्ये ७0 टक्केरुग्णांना रुग्णालयात तपासणी करेपर्यंत लक्षणे नव्हती असे म्हणतात. दिल्लीत तर ८0 टक्के रुग्ण असे बाह्यता निर्दोष असल्याची बातमी आहे. जगात इतरत्रही डॉक्टरांचा असाच अनुभव आहे. त्यामुळे भयंकर धोका म्हणजे रुग्ण उशिरा दवाखान्याची पायरी चढणार आणि तोपर्यंत आजार इतका बळावलेला असणार की, डॉक्टरी उपचारांचा फारसा परिणाम साधणार नाही. अमेरिकेत मृत्यूसंख्या एवढी हाताबाहेर गेली, याचे कारण हेच आहे की, कोरोना गनिमी हल्ले करीत आहे. तो अक्षरश: गळा धरेपर्यंत रुग्णाला ओळख देत नाही.अशा परिस्थितीत करायचे काय? कोरानाचा छुपा हल्ला शोधण्याचा काहीच मार्ग नाही काय? याबाबत काही महत्त्वाची माहिती वाचनात आली. ही माहिती डॉ. रिचर्ड लेवितन यांनी काल न्यूयॉर्क टाईम्समध्ये लेख लिहून प्रसिद्ध केली आहे. ती वाचकांपर्यंत पोहोचावी या हेतूने हा गोषवारा लिहीत आहे. डॉ. रिचर्ड हे श्वसनमार्गाशी संबंधित शास्त्राचे विशेषज्ञ असून, त्यांनी श्वसनोपचारात वापरण्याची काही उपकरणे स्वत: शोधून काढली आहेत. त्यांनी जगभर अनेक डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. सध्याच्या कोरानाग्रस्त काळात ते एका रुग्णालयात स्वयंसेवा करण्यासाठी गेले आणि तेथे केलेल्या निरीक्षणातून त्यांना ही कल्पना सुचली. रुग्णालयात इतरही रुग्ण येत होते. कोणीतरी, कुठंतरी आपटला आणि रुग्णालयामध्ये आल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत त्याला एकही लक्षण दिसत नव्हते. तसाच दुसरा कोणी दुखापत झालेला आला; तोपण धडधाकट दिसत होता. मात्र, तोही पॉझिटिव्ह निघाला. असे अनेक रुग्ण होते की, त्यांची श्वासोच्छ्वासाची कोणतीच तक्रार नव्हती; पण एक्स-रेमध्ये छातीत न्यूमोनिया दिसत होता आणि शरीरामध्ये प्राणवायूचे प्रमाण घटले होते. थोडक्यात, त्यांना ‘सायलेंट हायपोक्सिया’ आढळत होता.डॉ. रिचर्ड सांगतात की, सामान्य माणसामध्ये प्राणवायूची सघनता ९५ किंवा १०० टक्के असते, ती या छुप्या कोरोनाग्रस्तांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत घसरल्याचे आढळले; मात्र, त्याचा कोणताही बाह्य परिणाम त्या रुग्णालासुद्धा कळला नव्हता. फुफ्फुसातील पिशव्या एकेक करून बंद पडत होत्या. शरीरात प्राणवायू कमी झाला तरी कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकण्याचे काम चालू होते; त्यामुळे रुग्णाला फार धाप लागत नव्हती. त्यांना आठ-दहा दिवसांमागे ताप आला. पोट बिघडलं किंवा थकवा जाणवला अशा तक्रारी त्यांनी केल्या; पण श्वासोच्छ्वासाचा आधी त्रास झाल्याचे कुणीच सांगत नव्हते. ते रुग्णालयात आले त्याच दिवशी धाप सुरू झाली होती.आणि मग अगदी झपाट्यानं तब्येत खालावली. ती इतकी की रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांची फुफ्फुसे निकामी झाली आणि तातडीने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, जी काही सोपी गोष्ट नव्हे. डॉक्टरसाहेबांचे म्हणणे असे की, इतकी टोकाची वेळ येईपर्यंत थांबावे तरी कशाला? कोविड रुग्णालयात जा आणि ती स्वॅब टेस्ट करा. तिचा निकाल कळेपर्यंत वाट पाहा. ही यातायात करेपर्यंत आपण पटकन् प्राणवायूची पातळी मोजून घेतली, तर कोणी ‘सायलेंट हायपोक्सिया’च्या टप्प्यात आलाय किंवा नाही, हे काही सेकंदात कळेल.रुग्णाच्या शरीरामध्ये पुरेसा प्राणवायू जातोय, हे शोधण्याचे एक साधे उपकरण आहे, त्याला ऑक्सिमीटर असे म्हणतात. बहुतेक डॉक्टर ते बाळगून असतात. हाताचे बोट त्याच्या चिमट्यात अडकवायचे की काही सेकंदांमध्ये दोन आकडे उमटतात- एक नाडीचे ठोके आणि दुसरे प्राणवायूचे प्रमाण. ‘सायलेंट हायपोक्सिया’ असेल तर धाप लागण्याची वाट न पाहता ताबडतोब त्याला निरीक्षणाखाली ठेवून जरुरीप्रमाणे पुढचे उपचार करता येतील. यामुळे रुग्णालयांतील अत्यवस्थ केसेस कमी होतील. साधनांचा सुयोजित उपयोग होईल आणि लवकर निदान झाल्यामुळे रुग्ण वाचविण्याची शक्यता वाढेल.मी मंगळवारी रात्री हा लेख वाचल्यानंतर काही डॉक्टर मित्रांना ही माहिती सांगितली आणि न्यूयॉर्क टाईम्समधील लेख त्यांना वाचायला दिला. त्यांना हा मार्ग योग्य वाटतो. त्यांचे मत घेतल्यानंतर ही माहिती सरकारलाही कळविली आहे. सरकार योग्य तो उपयोग करून पाहील, अशी आशा आहे. ऑक्सिमीटर हे उपकरण बाजारात अडीच हजारांपासून चार हजार रुपयांपर्यंत विकत मिळते. ते कोणीही वापरू शकतो एवढे सोपे आहे. म्हणजे आपण ते घरीसुद्धा बाळगून दिवसातून एकदा-दोनदा आपल्या फुफ्फुसातील प्राणवायू तपासून पाहू शकतो! गडबड आढळली, तर मात्र थेट डॉक्टरांकडे गेले पाहिजे.
CoronaVirus: छुपा कोरोना शोधण्याची सोपी युक्ती सापडली!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 6:07 AM