नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातले आहे. जगभरात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. तर लाखो लोकांना संसर्ग होत आहे. (Coronavirus) दरम्यान, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यावरून संशय व्यक्त केला जात आहे. अनेक देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा योग्य आणि खरा आकडा जगासमोर आणलेला नाही, असा आरोप केला जात आहे. जगातील प्रसिद्ध मासिक असलेल्या द इकॉनॉमिस्टने जगातील अनेक देश कोरोनामुळे होत असेलल्या मृत्यूंची योग्य माहिती देत नसल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत जगभरात ७० लाख ते १.३ कोटी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. (The economist says, 7 million deaths worldwide due to coronavirus )
द इकॉनॉमिस्टच्या रिपोर्टनुसार केवळ आफ्रिका आणि आशियाच नाही तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांनीसुद्धा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत योग्य माहिती दिलेली नाही. या मासिकाने हा दावा मशीन-लर्निंग मॉडेलच्या माध्यमातून केला आहे. दुसरीकडे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आतापर्यंत कोरोनामुळे ३८ लाख ३० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरामध्ये आतापर्यंत १७ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आशिया खंडातील अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर द इकॉनॉमिस्टच्या दाव्यानुसार आतापर्यंत इथे २४ ते ७१ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशात कोरोनाबळींचा अधिकृत आकडा ६ लाख आहे. मात्र मासिकाच्या दाव्यानुसार इथे १५ ते १८ लाख जणांच्या मृत्यू झाले आहेत. युरोपमध्ये सरकारी आकडेवारीनुसार १० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र येथेही १५ ते १६ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा दावा मासिकाने केला आहे.
द इकॉनॉमिस्टने भारताताबाबत सांगितले की, इथे दररोज ६ ते ३१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीमध्ये दररोज ४ हजारा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारताने ही आकडेवारी फेटाळून लावली आहे. अनेक गरीब देश कोरोनामुले झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा लपवत असल्याचे सांगण्यात येत आहे.