नवी दिल्ली - जगभरातील देश कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे त्रस्त आहेत. कोरोनाग्रस्तांच्या मृताचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. ज्या देशांनी कोरोना व्हायरसला गांभीर्याने घेतले नाही, तिथे मृतांची संख्या वाढत आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू झाला, तेंव्हा चीनने दहा दिवसांत एक हजार बेडचे रुग्णालय उभे केले होते. चीनचा हा विक्रम इंग्लंडने मोडीत काढला आहे.
इंग्लंडने चीनचा विक्रम मोडीत काढत केवळ दहा दिवसांत ४ हजार बेडचे रुग्णालय उभे केले. या नवीन रुग्णालयाला ‘नाईटेंगल’ नाव देण्यात आले आहे. बुधवारपासून या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून पंतप्रधान बोरीस जॉनसन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला क्वॉरन्टाईन केले होते.
जगभरातील १९५ हून अधिक देशात ९ लाखहून अधिक कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. आतापर्यंत ४० हजार लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. इंग्लंडमध्ये देखील कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे इंग्लंडने सेना बोलवून ४ हजार बेडचे रुग्णालय उभं केलं. चीनने देखील अशाचप्रकारे रस्त्याच्या कडेला दहा दिवसांत रुग्णालय उभं केले होते.
पूर्व लंडनमध्ये डॉकलँड जिल्ह्यात एक्सल कन्वेंशन सेंटर होते. या सेंटरचे रुपांतर रुग्णालयात करण्यात आले आहे. येथे दोन-दोन हजार बेडचे दोन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून रुग्णालयात बेडची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे हे रुग्णालय उभारण्यात आले आहे.