इस्लामाबाद - संपूर्ण जगात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना विषाणूमुळे सर्व मानवजात संकटात सापडली आहे. अशा संकटाच्या प्रसंगी जगभरातील डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवेत गुंतले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे देवदूत म्हणू पाहिले जात आहे. पण काही विकृतांकडून मात्र डॉक्टरांना त्रास देण्याचे उद्योग सुरू आहेत. काही ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले झालेत, तर काही ठिकाणी महिला डॉक्टर आणि नर्ससमोर अश्लील इशारे करण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. दरम्यान, तर कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरांकडे सेक्सची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमध्ये उघडकीस आला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित आणि कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या मदतीसाठी एक ऍप बनवण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानी लोकांकडून या ऍपचा फायदा घेण्याऐवजी गैरफायदा घेतला जात आहे. या ऍपच्या माध्यमातून सेवा देत असलेल्या महिला डॉक्टरांना ऑनलाइन ट्रोलिंग, अश्लील शेरेबाजी आणि मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे. आशा छळाची शिकार झालेल्या महिला डॉक्टरांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे.
रुग्ण म्हणून मदत मागण्यासाठी येणाऱ्या काही विकृतांकडून वय आणि इतर खाजगी माहिती विचारली जाते. कधी अश्लील छायाचित्रे आणि पॉर्न साईटच्या लिंक पाठवल्या जातात, अशी व्यथा अनेक महिला डॉक्टर, नर्स आणि महिला मेडिकल स्टाफने मांडली आहे.
दरम्यान, या प्रकारांचा महिला डॉक्टरांच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक हुशार महिला डॉक्टरांनी या क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.