- संदीप शिंदे मुंबई : सोशल डिस्टन्सिंगचे स्वयंप्रेरणेने पालन, नियमाचे उल्लंघन केल्यास तब्बल ११ हजार डॉलरचा (५ लाख ३५ हजार रुपये) दंड व ६ महिने शिक्षेचा धाक, ‘कोविड-१९’चा मुकाबला करणारी सक्षम आरोग्य यंत्रणा, उत्पन्न गमावलेल्यांना सरकारी अर्थसहाय्य आणि जनतेचा सरकारवर असलेला दृढ विश्वास या बळावरच आॅस्ट्रेलियाने कोरोनाला रोखण्यात यश मिळविल्याची भावना मूळचे पुणेकर असलेल्या आणि आता सिडनी शहरात स्थायिक झालेल्या राजेंद्र पारगे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.आॅस्ट्रेलियात पहिला रुग्ण २५ जानेवारी रोजी आढळला. तर, २९ मार्च रोजी सर्वाधिक ५२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. तो आलेख आता झपाट्याने खाली येत असून, १७ एप्रिल रोजी रुग्णसंख्या ६५ होती. ३ महिन्यांत ६,५६५ रूग्ण आणि ६९ मृत्यू या टप्प्यापर्यंत संसर्गाला रोखण्यात त्यांना यश आले आहे. या आजारावर मात करणारे ४ हजारांपेक्षा जास्त आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने सरकार आणि लोकांनी या संकटाचा मुकाबला केला. त्यामुळे कधीही परिस्थिती हाताबाहेर गेली नाही. भारताप्रमाणेच इथल्या जनतेनेही कोरोनाला हरवण्याचा निर्धार केल्याचे पारगे कुटुंब सांगते.पारगे यांनी ड्रायव्हिंग स्कूलचा व्यवसाय बंद ठेवला आहे. शरणार्थींच्या कॅम्पमधील चाईल्ड केअर आणि इंग्रजी संभाषण विभागात कार्यरत असलेली त्यांची पत्नी वर्षा यांचे कार्यालयही बंद आहे. अशा पद्धतीने मासिक उत्पन्न गमावलेल्या लोकांसाठी १ लाख ३० हजार कोटींचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला महिन्याकाठी तीन हजार डॉलरपर्यंतचे अर्थसहाय्य मिळेल. पारगे यांची कन्या पूजा खासगी कंपनीत कार्यरत असून तीसुद्धा घरूनच काम करते. त्यांच्या कंपनीतही २० टक्के वेतन कपात होणार आहे. आर्थिक संकट किंवा नैराश्य येऊ नये म्हणून बहुतांश ठिकाणी कर्मचाऱ्यांना रोज १५ मिनिटे मानसिक आरोग्याचे धडेही दिले जातात. शाळा, कॉलेजचे विद्यार्थी आॅनलाईन धडे गिरवत आहेत. घरी असलेल्यांसाठी सरकारच्या आॅनलाईन अभ्यासक्रमांना प्रतिसाद मिळत आहे.लग्नाला ५ आणि अंत्ययात्रेला १० जणया काळात लग्नामध्ये फक्त ५ तर, अंत्यविधीसाठी १०पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. ‘‘देशात पूर्ण लॉकडाऊन नाही. अत्यावश्यक सेवा, उत्पादन प्रक्रिया, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू आहे. वर्क फ्रॉम होम ज्यांना शक्य नाही ते कायार्लयांमध्ये जातात. किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडता येते. परंतु, प्रत्येक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन होते. दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास बंदी आहे. बिनकामाचे घराबाहेर पडल्यास दंड आणि कारावासाची भीती आहे. परंतु, ९९ टक्के लोक स्वयंप्रेरणेने नियम पाळतात, असे वर्षा यांनी सांगितले.
CoronaVirus: चार गोष्टींनी कमाल केली; ऑस्ट्रेलियानं जवळपास जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 2:32 AM