- प्रसाद ताम्हनकर(prasad.tamhankar@gmail.com)कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा त्यावर कोणता उपचार प्रभावी ठरेल हे समजण्यासाठी बराच कालावधी गेला. सतत हात धुणे, मास्क वापरणे आणि मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन हे पहिले उपाय अत्यंत प्रभावी ठरतील. याकाळात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोक अनोळखीच काय; पण ओळखीच्या लोकांच्या संपर्कातदेखील येण्याचे टाळत होते. डॉक्टर, पोलीस यासारख्या ‘कोरोना योद्ध्यांनी’ मात्र जिवाची बाजी लावत आपल्या कर्तव्याचे पालन केले. यानंतर बऱ्याच रुग्णालयांनी रुग्णाशी थेट संपर्क न होता त्याचे निदान करता येईल, यासाठी अनेक उपाय योजले. टॉक थेरपी, व्हिडिओ थेरपीद्वारे डॉक्टर रुग्णांचा इलाज करू लागले. या सगळ्याला एक अभिनव जोड मिळाली ती मेडिकल रोबोची! या रोबोच्या मदतीने विविध देशांतले डॉक्टर्स रुग्णांच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यांची तपासणी करू लागले आणि अचूक निदान करू लागले. आता तर हाँगकाँगच्या हॅनसन कंपनीने कोरोना रुग्णांची काळजी घेणारी एक रोबो नर्सच तयार केली आहे. तिचे नाव आहे ‘ग्रेस’! कोरोना रुग्णांना मदत करणाऱ्या हेल्थ वर्कर्सना मदत करणे हा तिचा प्रमुख उद्देश असला, तरी होम आयसोलेट असलेल्या रुग्णांची ती एखाद्या हुशार नर्सप्रमाणे काळजी घेऊ शकणार आहे. यामुळे हेल्थ वर्कर्स रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कापासूनदूर राहू शकतील व रुग्णाचीदेखील आबाळ होणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावरत आधारित या ‘ग्रेस’च्या छातीत एक थर्मल कॅमेरा लावलेला असून, त्याद्वारे ती रुग्णाचे टेंपरेचर चेक करू शकणार आहे, तसेच ते रीडिंग डॉक्टरांनादेखील वेळोवेळी पाठवीत राहणार आहे. बायो रीडिंगबरोबरच रोबो नर्स ‘टॉक थेरपी’ व इतर उपचारांमध्ये मदत करण्यासाठीदेखील सक्षम आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने रुग्णाच्या प्रश्नांना इंग्रजी, मेंडेरीन आणि कॅटोनिज भाषेत उत्तरेदेखील देणार आहे. आपल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी चेहऱ्यावरील ४८ प्रकारचे हावभाव समजण्याची ‘ग्रेस’ची क्षमता आहे, हे विशेष. कोरोनाकाळात घरात बसून असलेल्या किंवा विलगीकरणात असलेल्या अनेक रुग्णांच्या मन:स्थितीवर अत्यंत वाईट परिणाम झालेले आहेत, येणाऱ्या काळात एखाद्या नर्सप्रमाणे काळजी घेणारी, मित्रासारखी सतत बरोबर राहून संवाद साधणारी ग्रेस वैद्यकीय क्षेत्रात एक महत्त्वाचे स्थान मिळवील असा तिच्या उत्पादकांचा दावा आहे.
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीला ‘ग्रेस’ - रोबो नर्स!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 5:48 AM