नवी दिल्ली - पाकिस्तानला ‘रियासत-ए-मदिना’ बनविण्याचे वचन देऊन सत्तेत आलेले इमरान खान सरकार देशातील हिंदूंवर अन्याय करत असल्याचे समोर आले आहे. येथील हिंदू समूदायाला राशन देण्यास पाकिस्तान सरकारने नकार दिला आहे. कोरोना व्हायरसने थैमान घातलेल्या सिंध प्रांतातील कराची शहरातील ही घटना आहे.
देशात आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून येथील नागरिकांना राशन आणि गरजेच्या वस्तू देण्यात येत आहेत. मात्र राशन आणि जीवानावश्यक वस्तू हिंदूंना देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला आहे. सरकारकडून देण्यात येणारे राशन केवळ मुस्लिमांसाठीच असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये प्रचंड राग आहे.
याआधी सिंध सरकारने आदेश दिले होते की, लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर कामगार आणि मजुरांना स्थानिक एनजीओ आणि संस्थांच्या मदतीने राशनचे वाटप करण्यात यावे. मात्र सरकारी आदेश डावलून येथील प्रशासन हिंदूंना राशन देण्यास नकार देत असल्याचा दावा येथील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे.
सरकारकडून देण्यात येणारे राशन घेण्यासाठी तीन हजार हिंदू जमा झाले होते. यावेळी त्यांची स्क्रिनिंग करण्यासाठी काहीही तयारी करण्यात आलेली नव्हती. संपूर्ण सिंध प्रांतात हिंदूंना राशन देण्यास नकार देण्यात आला आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समूदाय गंभीर खाद्य संकटातून जात असल्याचा दावा राजकीय कार्यकर्ते डॉ. अमजद अयूब यांनी केला आहे.
पाकिस्तानात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होते आहे. आतापर्यंत १५९३ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब आणि सिंध प्रांतात सर्वाधिक रुग्ण आहेत. या महासंकटात देखील पाकिस्तान सरकार हिंदूंसोबत भेदभाव करत आहे. त्यामुळे भारतातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.