नवी दिल्ली - अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरस बाधित मृतांची संख्या पाच हजारच्या पुढे गेली आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या चीन, इटली आणि स्पेन या देशांपेक्षा अधिक झाली आहे. तर प्रत्येक अडीच ते सहा मिनिटांच्या कालावधीत अमेरिकेत एक मृत्यू होत आहे. त्यामुळे अमेरिकेतील रुग्णालयांची शवागृह फुल्ल झाली आहेत.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठात कोरोना व्हायरस रिसोर्स केंद्र तयार करण्यात आले आहे. येथे मागील २४ तासात ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसांत झालेल्या मृत्यूचा हा सर्वोच्च आकडा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लोकांनी कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुढील दोन आठवड्यात स्थिती आणखी बिघडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जॉन हाफकिन्स केंद्राने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांवर पोहोचली आहे.
संपूर्ण देशात मृतांची वाढती संख्या पाहता मृतदेहांचे अंत्यसंस्कार करणे कठीण झाले आहे. त्यातच न्यूयॉर्कची स्थिती अजुनच गंभीर झाली आहे. मागील तीस वर्षांपासून मृतदेहांचे दफण करण्याचे काम करणाऱ्या इंटरनॅशनल फ्युनरल कंपनीचे सीईओने मर्मो यांनी म्हटले की, मृतदेहांना सांभाळणे आता हाताबाहेर गेले आहे.
अमेरिकेतील रुग्णालयातील शवागृह जवळपास फुल्ल झाले आहेत. या मृतदेहांवर अंतिम संस्कार करणे देखील धोकादायक बनले आहे. यापैकी किती मृतदेहाची मी विल्हेवाट लावू शकतो हे आता सांगता येणार नसल्याचे मर्मो यांनी सांगितले.