- बेल्जिअमजगण्याचे आनंद छोटे असतात आणि तेच महत्त्वाचे आणि अस्सल असतात हे माणसाला जाणवायला लागलं तो हा काळ. बेल्जिअम डॉक्टरची ही गोष्ट ब्रसेल्स शहरातली. डॉ. अॅण्टोनी ससेन, वय वर्षे ५८. मूत्रविकारतज्ज्ञ. आजवर अनेक रुग्ण पाहिले. मरण काही पाहिलं नव्हतं असं नाही; मात्र बेल्जिअममध्ये कोरोनानं उडविलेला हाहाकार सगळ्यांनाच विषण्ण करून टाकणारा आहे. त्याला हे डॉक्टरही अपवाद नाहीत. ते व त्यांचे सहकारी श्वसनविकार, त्यातून मूत्राशयाचे होणारे विकार यासाठीचे उपचार करीत होतेच. मात्र, त्याच काळात त्यांना कोरोनानं गाठलं. लागण झाली आणि तब्येत इतकी खालावली की ते साडेतीन आठवडे कोमात गेले. सगळं संपल्यातच जमा होतं.पण, कोरोनाशी ही लढाई ते जिंकले आणि कालच त्यांना अतिदक्षता कक्षातून बाहेर आणलं. त्यानंतर डेल्टा कायरॅक हॉस्पिटल जिथं ते काम करतात, तिथूनच त्यांनी परिजनांसह सर्वांशीच व्हिडिओ संवाद साधला. ते सांगतात, ‘मलाही एका क्षणी वाटलं होतं की, संपलं, आता आपण मरणार! आता या काळझोपेतून आपण कधीही उठणार नाही! मात्र एकीकडे असं वाटत असताना दुसरीकडे मी मनात स्वत:ला सांगत होतो की, ऊठ, जागा हो, तुला जगायचं आहे. कामं आहेत, तू असा झोपून कसं चालेल..’ ही जगण्यामरण्याची झुंज अंतिमत: ते जिंकले आणि उठून बसले. तो उठून बसण्याचा, पहिल्यांदा डोळे उघडण्याचा अनुभव ते सांगतात, ‘आजवर आयुष्यात मला कधीही इतका आनंद झाला नव्हता. मी डोळे उघडले तर समोर माझे सहकारी डॉक्टर उभे होते. त्यांचे हसरे चेहरे पाहिले, त्यावेळी शब्दात नाही सांगता येणार काय वाटलं. विलक्षण होतं ते! मी जगलो, जागा झालो ते कसं असा विचार केला तर वाटतं एकीकडे मरण उभं होतं. माझे वडील चार वर्षांपूर्वी गेले, ते मला दिसले. मी त्यांच्याशी बोलत होतो. दुसरीकडे मला वाटत होतं की, हा आपला रस्ता नाही. आपल्याला जगायचं आहे.’जगण्यामरण्याची सीमा ओलांडून ते आले आणि ते साऱ्या जगाला एकच गोष्ट सांगताहेत, ‘आता एकच इच्छा आहे, एकदा माझ्या कुटुंबाला कडकडून मिठी मारायची आहे. मला लागण झाली तसं मी त्यांना फक्त लांबून पाहतो आहे. आता बरा झालो की मी त्यांना मिठी मारणार आहे.’आपली माणसं, ती सोबत असणं, त्यांचा स्पर्श, त्यांना मिठी मारून सांगणं की मी आहे, तुम्ही आहात माझ्यासाठी हे सारं किती मोलाचं असतं, पण एरव्ही त्याची किंमत नसते. ती मरणाच्या दारात या डॉक्टरांनाच नाही आता सगळ्यांना कळते आहे. बेल्जिअममध्ये तर कोरोनाने मरणाचा चक्रव्यूह आखलाय. आजपर्यंत ३८,४९६ जणांना बाधा झाली, तर ५,६३८ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगण्याची लढाई अखंड चालू आहे.
CoronaVirus: वाटलं होतं, आता मी मरणार!; कोरोनाबाधित डॉक्टरची साडेतीन आठवडे झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:14 AM