वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र, अशातच कोरोना व्हायरसने पाय पसरल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दोन मोर्चांवर एकाचवेळी लढावे लागत आहे. डब्ल्यूएचओला निधी न देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ट्रम्प यांनी थेट अमेरिकेच्या सर्वोच्च संसदेलाच धमकी दिली आहे.
आपल्या काही उमेदवारांची नियुक्ती न झाल्याने कामकाजामध्ये अडचणी येत आहेत. त्यांच्या उमेदवारीला संमती न दिल्यास अमेरिकी सिनेटची दोन्ही सभागृहे भंग करेन, अशी थेट धमकीच दिली आहे. ट्रम्प हे वादग्रस्त निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या आणि काँग्रेसमध्ये नेहमीच वादाची ठिणगी उडत आलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जर सभागृहाने माझे ऐकले नाही तर मी माझ्या संविधानिक अधिकारांचा वापर करन काँग्रेसच्या दोन्ही सदनांना भंग करेन, असे रागाने म्हटले आहे.
प्रो फॉर्मा सत्रावेळी शहर सोडून जाणे म्हणजे कर्तव्यामध्ये कसूर केल्यासारखे आहे. अमेरिकन नागरिक संकटात असताना हे सहन करू शकत नाहीत. हा एक घोटाळाच आहे आणि तो अनेक वर्षांपासून केला जात असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. सध्याच्या परिस्थितीमुळे अडचणी आल्याने १२९ उमेदवारांचे सदस्यत्व अडकलेले आहे. त्यातील अधिकतर नामांकने रिक्त जागांसाठी आहे. या जागा कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी भरायला हव्यात. यामध्ये काही महत्वाची पदेही आहेत, असे ट्रम्प यांनी सांगितले.
राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक, फेडरल रिझर्व्ह बोर्डाचे सदस्य आणि संयुक्त राज्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी ट्रेझरी या जागा रिक्त आहेत. त्यांची नियुक्ती करण्याचा आपल्याला अधिकार आहे. सीनेटनी कर्तव्याचे पालन करत त्यांना मतदान करावे. नाहीतर मी या जागा स्थगित करून तात्पुरते अधिकार आणि नियुक्त्या करेन, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.