Coronavirus in China : चीनमध्ये सध्या वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढचत आहे. चीनकडून झिरो कोविड पॉलिसी हटवल्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तसंच येत्या काळात मृतांची संख्याही वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी प्रथमच मौन सोडलं.
लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पावले उचलली जातील, असं जिनपिंग म्हणाले. कोरोना महासाथीला अधिक चांगल्या पद्धतीने तोंड देण्यासाठी आपण देशात आरोग्य अभियान सुरू केले पाहिजे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समाज रचना मजबूत करावी लागेल जेणेकरून लोकांचे प्राण वाचू शकतील, असंही त्यांनी नमूद केलं.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चीन सरकारने अत्यंत कडक निर्बंध लागू केले होते. पण आता हे निर्बंध हटवल्यानंतर चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. पुढील काही महिन्यांत मृतांचा आकडा वाढू शकतो असा अंदाज आहे. तर दुसरीकडे देशातील मोठ्या लोकसंख्येला औषधांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याचंही म्हटलं जात आहे. शिवाय देशातील वृद्धांच्या मोठ्या लोकसंख्येला लस मिळालेली नसल्याचंही सांगण्यात येतंय.
सध्या चीनमध्ये कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणामुळे नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य अभियान अधिक तत्परतेने सुरू केले पाहिजे. महासाथ रोखण्यासाठी अशी सामुदायिक रचना तयार करावी लागेल, जेणेकरून लोकांचे जीवन प्रभावीपणे वाचवता येईल, असंही जिनपिंग यांनी नमूद केलं.
कोविड डेटा पब्लिश करणार नाहीएकीकडे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं कोरोनामुळे देशभरातील संसर्ग आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची आकडेवारी जाहीर करणार नसल्याचं म्हटलंय. मास टेस्टिंग संपवल्यानंतर कोरोनाची आकडेवारी ट्रॅक करणं अशक्य झालं आहे. कारण आता कोरोना चाचणीचे रिपोर्ट सरकारला देणं अनिवार्य राहिलेलं नाही.