बिजींग-
चीनमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सातत्याने वाढत आहे. चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात मोठा जिल्हा चाओयांगने आपल्या रहिवाशांसाठी आठवड्यातून तीन वेळा चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. वाढत्या कोरोना चाचणीसोबतच शांघायसारख्या कडक लॉकडाऊनची भीती लोकांना वाटत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बीजिंगमध्ये अन्नपदार्थ, धान्य आणि मांस यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
गेल्या तीन दिवसांत डझनभर नवे रुग्ण समोर आले आहेत. सोमवारी, बीजिंगमध्ये ७० नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत, त्यापैकी ४६ चाओयांगमधील आहेत. २.२ कोटी लोकसंख्येच्या बीजिंग शहरात एकट्या चाओयांगमध्ये ३५ लाख लोक राहतात. बाधितांची संख्या कमी असली तरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकार शांघायप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू करू शकते. शांघायमध्ये गेल्या चार आठवड्यांपासून कडक लॉकडाऊन आहे. चीन सध्या कोविड-19 च्या वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा सामना करत आहे.
बीजिंगमध्ये अन्नाची कमतरताबीजिंगचे चाओयांग हे व्यवसायाचे केंद्र आहे. मोठमोठ्या इमारतींबरोबरच अनेक मोठे मॉल्स आणि दूतावासही येथे आहेत. आतापर्यंत, बीजिंगमधील १६ पैकी आठ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. एक रुग्ण आढळला तरी इमारत सील केली जात आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका आठवड्यापासून शहरात संसर्गाची साखळी पसरली होती. राजधानीत शांघायच्या तुलनेत कमी प्रकरणं आहेत, परंतु तेथे अन्नाची कमतरता भासू लागली आहे, ज्यामुळे असे दिसते की बीजिंगच्या लोकांना कोणताही धोका पत्करायचा नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक बाजारपेठांमध्ये अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. डिलिव्हरी अॅप्सद्वारे असेही सांगण्यात आले आहे की ते भाज्या आणि मांसाचा साठा संपला आहे. सोशल मीडियावर, लोक सतत त्यांच्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगत आहेत, कारण लॉकडाऊन कधीही लादला जाऊ शकतो.
आठवड्यातून तीन दिवस चाचणीचाओयांगमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांची आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी तीन दिवस कोरोना चाचणी करावी लागेल, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सामूहिक चाचणी इतर १० जिल्ह्यांमध्ये देखील वाढविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या घोषणेपासून लोकांनी सातत्याने जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सुरुवात केली आहे. आता ११ जिल्ह्यांतील कोट्यवधी लोकांची आठवड्यातून तीन वेळा चाचणी करावी लागणार आहे.