गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगासमोर मोठं संकट उभं केले. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून आलं. परंतु कोरोना लसीकरणामुळे अनेक देशात आता महामारी नियंत्रणात आली आहे. कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. त्यातच चीनमध्ये ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे गेल्या ३ दिवसांत रुग्णसंख्या ९ पटीने वाढल्यानं चिंता वाढली आहे. आता चीनपाठोपाठदक्षिण कोरियात कोविडचा प्रकोप पाहायला मिळत आहे.
चीननंतर(china) आता दक्षिण कोरियात(South Korea) बुधवारी ४ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. दक्षिण कोरियाच्या माध्यमांनुसार, देशात ४ लाख ७४१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील जानेवारी महिन्यांच्या तुलनेत आतापर्यंतची ही सर्वात मोठी आकडेवारी आहे. यातील बहुतांश स्थानिक संक्रमण असल्याचं आढळलं. म्हणजे देशात कोरोनाचं लोकल ट्रान्समिशन सुरू झालं आहे.
कोरोना नियंत्रण संस्थेनुसार, बुधवारी आलेल्या ताज्या आकडेवारीनंतर दक्षिण कोरियात एकूण रुग्णसंख्या ७६ लाख, २९ हजार २७५ रुग्ण झाले आहेत. मंगळवारी दक्षिण कोरियात २४ तासांत २९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियाप्रमाणेच चीनमध्ये वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने १० शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिलेत. आतापर्यंत ३ कोटी नागरिकांना घरात कैद राहावं लागले आहे. गेल्या शुक्रवारी ५५८ रुग्ण आढळले तर मंगळवारी हा आकडा ५ हजारांपर्यंत पोहचला आहे.
चीनमध्ये २०१९ च्या अखेरीस वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेथे एका वर्षाहून अधिक काळ अधिकृतपणे कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झालेली नाही, अशी बातमी एएफपी या वृत्तसंस्थेने दिली आहे. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चीनने रुग्णालयातील बेड सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोविड रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबमधील सुमारे ३ कोटी रहिवाशांना लॉकडाऊनमध्ये राहावं लागत आहे. याशिवाय शांघाय आणि इतर शहरांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत.
चीनमध्ये ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट आल्यानंतर जानेवारीपासून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. परंतु त्यावर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश आले. परंतु आता चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढीला ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट ‘स्टेल्थ ओमायक्रॉन’ कारण असल्याचं उघड झालं आहे. विशेष म्हणजे हा सब व्हेरिएंट नवीन नव्हे तर चीनच्या आधी काही देशांमध्ये याचा प्रभाव पाहायला मिळाला. ओमायक्रॉनच्या स्टेल्थ व्हेरिएंटमुळे(Stealth omicron) रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. हे पाहता चीनने पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला आहे.