नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा कहर जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,79, 080 पोहोचली आहे. कोरोनामुळे 185 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 16,524 वर पोहोचली आहे. 1,02,423 रुग्ण हे बरे झाले आहेत. भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 499 वर पोहोचली आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा फटका सर्वच देशांना बसला आहे. इटलीमध्ये मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या ही वेगाने वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या धसक्याने जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. भारतातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे कौतुक केले आहे.
भारताकडे प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती आहे असं म्हणत WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं कौतुक केलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रायन यांनी भारताचं कौतुक केलं आहे. ‘भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 वर पोहचली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी भारत उचलत असलेली पावले कठोर असली तरी ती योग्यच आहेत. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरू ठेवलं पाहिजे असंही WHO ने म्हटलं आहे.
मायकल रायन यांनी ‘चीनप्रमाणेच भारत हा देखील जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. कोरोनाचं संकट ओढवल्यानंतर त्यांनी आक्रमक निर्णय घेण्यात आले. कोरोनाशी लढा देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय योग्यच आहेत. तसेच भारताने ज्याप्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आताही दिसून येते आहे’ असं म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय प्रत्येक देश घेत आहे. मात्र लॉकडाऊनवर जागतिक आरोग्य संघटनेने भाष्य केले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसे नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओ(WHO)चे मायकल रायन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही तर जे आजारी आहेत, पीडित आहेत त्यांना शोधण्याची आणि देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे. तसे केलं तरच हे थांबवता येऊ शकते असं त्यांनी सांगितले.
तसेच लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि मग धोका वाढेल. चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने युरोप आणि अमेरिकेला विळख्यात घेतलं आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगितले आहे, लॉकडाऊन जाहीर केले आहे. युरोपमधील बर्याच शहरांमध्ये बार, रेस्टॉरंटसह अनेक सुविधा काही दिवसांपासून बंद आहेत. तसेच जेव्हा चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने लॉकडाऊन केले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. आता युरोप, अमेरिका आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे. जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो असं मायकल रायन यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus:...मग कोरोनाचे गांभीर्य घालवले कोणी?; शिवसेनेने विचारला पंतप्रधानांना सवाल
coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन
Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील