जेरुसलेम - कोरोनाचा वाढता संसर्ग पाहून सर्वच जण धास्तावले आहेत. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यत 8500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर लाखो लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 170 हून अधिक देशांमध्ये संसर्ग झाला आहे. भारतातही 170 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने इस्राईलमध्ये एका भारतीयाला चिनी समजून मारहाण करण्यात आली आहे.
इस्राईलमध्ये एका भारतीय वंशाच्या नागरिकाला चिनी समजून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. इस्राईलमधील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. शालेम शिंदसोन असं या व्यक्तीचं नाव असून त्याला मारहाण करण्यात आली. शालेम हा चीनचा नागरीक असल्याचा त्यांचा समज झाला. त्यानंतर कोरोना, कोरोना म्हणत दोन व्यक्तींनी शालेम याला बेदम मारहाण केली. 2017 पासून शालेम इस्राईलमध्ये आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेदम मारहाण केल्याने शालेमला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील 16 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आहेत. यातील काहींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये 1, दिल्लीमध्ये 11, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 13, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 49, पंजाबमध्ये 3, तेलंगणामध्ये 12, राजस्थान 7, उत्तर प्रदेशमध्ये 17, लडाख 8, तमिळनाडू 2, जम्मू-काश्मीर 4 व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
कोरोनाचा फटका हा अनेक कंपन्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार असून जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील बेरोजगारांची संख्या 2 कोटी 50 लाखांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. संघटनेच्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक मोठ्या कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प बंद ठेवले आहेत. आर्थिक संकटामुळे कंपन्यांकडून कामगार कपात केली जाऊ शकते. यामुळे जवळपास 2 कोटी 50 लाख कामगार बेरोजगार होऊ शकतात. मंदी आणि कामगार कपातीने यंदा कामगारांचे 3400 डॉलर्सचे नुकसान होईल असं संघटनेने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा कोट्यवधी लोकांना फटका बसणार, जगभरात बेरोजगारांची संख्या वाढणार
Coronavirus : संपूर्ण कुटुंबाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, 'या' सरकारने 1 किमीपर्यंत कर्फ्यू लावला!
Coronavirus: हे विषाणूशी युद्धच; आम्ही लढतोय, पण तुमचं आणखी सहकार्य हवंयः मुख्यमंत्र्यांची साद
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली; जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुग्ण?
Coronavirus : 'राहुल गांधींनी कार्टून चॅनलऐवजी न्यूज चॅनल पाहावं'