लंडन -इंग्लंडचेपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. जॉन्सन हे 27 मार्चला कोरोना संक्रमित असल्याचे समोर आले होते. जॉन्सन यांनीस्वतःच यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली होती.
ट्विटमध्ये जॉन्सन यांनी म्हटले होते, की 'गेल्या 24 तासांत मला कोरोनाची काही लक्षणे जाणव आहेत. माझी कोरोना टेस्टदेखील पॉझिटिव्ह आली आहे. आता मी स्वतःला आयसोलेट करत आहे. मात्र आपण कोरोनाविरोधात युद्ध लढत असताना, मी व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने नेतृत्व करत राहील.' यानंतर डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांनी सांगितले होते, की काही लक्षणे दिसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉन्सन यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पंतप्रधान आता डाउनिंग स्ट्रीटमध्येच एकांतवासात आहेत. मात्र, आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याने जॉन्सन रुग्णालयात दाखल झाले आहेत. येथे त्यांच्यावर काही टेस्ट होणार आहेत.
पंतप्रधान बोरिस यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत, 'डियर पंतप्रधान बोरिस जॉनसन, आपण एक फायटर आहात. यासंकटावरही आपण मात कराल. मी आपल्यासाठी आणि ब्रिटनसाठी प्रार्थना करतो,' असे म्हटले होते. प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्सदेखील कोरोनाच्या चपाट्यात सापडले आहेत. ते स्कॉटलंडमध्ये एकांतवासात आहेत. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीने महारानी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांनीही राजमहाल सोडला आहे.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत 4313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू -इंग्लंडमध्ये आतापर्यंत 4313 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 41,903 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जगात आतापर्यंत 12,06,480 जणांना कोरोनाची लागण झाली असून 65,272 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी आतापर्यंत 2,33,300 कोरोनाग्रस्त बरेही झाले आहेत.