नवी दिल्ली : जगातील कुख्यात दहशतवादी संघटना इसिसला (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) सुद्धा कोरोना व्हायरसची धास्ती बसली आहे. इसिसने आपल्या दहशवाद्यांसाठी आरोग्याविषयक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये कोरोना किंवा संक्रमित लोकांपासून दूर रहावे, हात धुवून अन्न खावे आणि युरोपला जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
इसिसने 'अल नबा' या वृत्तपत्रातून दहशतवाद्यांना या सूचना दिल्या आहेत. यामध्ये तोंडाला मास्क लावा किंवा तोंड झाकून ठेवा, शिंकताना तोंडावर हात ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इसिसकडून दहशतवाद्यांना युरोपपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इसिसचे वर्चस्व असलेल्या इराक-सीरियामध्ये अद्याप कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले नाही. पण, इराकमध्ये 79 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सीरियामध्ये कोणालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे समजते. मात्र, या ठिकाणी कोरोना पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, चीनमधील कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जगभरात 1,45,000 रुग्ण कोरोनाबाधित असून, जवळपास 5 हजार लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.