दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन(omicron) व्हेरिएंटमुळे जगाची चिंता वाढवली आहे. अनेक देशात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. तरीही लसीचे दोन्ही डोस आणि बूस्टर डोस घेऊनही ओमायक्रॉन व्हेरिएंट इम्युनिटीला चकमा देण्यात यशस्वी होत आहे. जगातील बहुतांश लोकसंख्या अद्यापही लसीकरणापासून वंचित आहे. जोवर लसीकरण पूर्ण होत नाही तोपर्यंत संक्रमणाचा धोका कायम राहणार असल्याचं WHO ने सांगितले.
भारतासह जगातील अनेक देशात लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वाट पाहावी लागत आहे. त्यात इस्त्राइलनं त्यांच्या लोकांना लसीचा चौथा डोस देणं सुरू केले आहे. इस्त्राइल जगातील पहिला देश आहे ज्याठिकाणी लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. आता कोरोना लसीचा चौथा डोसही या देशात दिला जाणार आहे. त्यामुळे जगातील हा पहिलाच देश आहे जो कोरोना लसीचा चौथा डोस देणार आहे. इस्त्राइल पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी चौथ्या डोसाची घोषणा केली आहे. हा चौथा डोस जे ६० वर्षावरील वृद्ध आणि गंभीर आजाराने ग्रस्त असतील अशांना देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
जागतिक आकडेवारीनुसार जगातील ५६.७ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजे इतरांनाही अद्याप लसीकरणाची प्रतिक्षा आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशातील ८.१ टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. भारतात आतापर्यंत १३८ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. १८ वर्षावरील ८८ टक्के लोकसंख्येला पहिला तर ५७ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
इस्त्राइलमध्ये पाचवी लाट, ओमायक्रॉनमुळे पहिला मृत्यू
ओमायक्रॉनच्या इशाऱ्यावर इस्त्राइलनं तात्काळ हवाई वाहतुकीवर निर्बंध लावले होते. तरीही या देशात ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरला. देशात कोरोनाची पाचवी लाट सुरु झाल्याचा धोका पंतप्रधांनांनी सांगितला आहे. दक्षिण शहरातील बीरशेबा येथे सोरोको हॉस्पिटलमध्ये ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. जो ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित होता. २ आठवड्यांपूर्वी तो रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. इस्त्राइलमध्ये ५ महिने ते १२ वर्षापर्यंतच्या मुलांनाही लसीचे डोस देण्यात येत आहेत.