मबाबाने (इस्वाटिनी) - कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांसोबतच जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही मृत्यू झाला आहे. दरम्यान, आफ्रिका खंडातील देश असेलल्या इस्वाटिनीच्या पंतप्रधान एम्बरोसे डालामिनी यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. एम्बरोसे डालामिनी यांना महिनाभरापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. ५२ वर्षीय डलामिनी यांच्यावर दक्षिण आफ्रिकेतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते.इस्वाटिनीमध्ये राजेशाही शासनव्यवस्था आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार तेथील सरकारने रविवारी रात्री आपल्या पंतप्रधानांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांच्या अकाली निधनाची माहिती देशवासीयांना देण्याची सूचना राजपरिवाराकडून मिळाली आहे. डलामिनी यांचे निधन रविवारी दुपारी दक्षिण आफ्रिकेतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान, झाले, असे उपपंतप्रधानांनी सांगितले.कोरोनाचा संसर्ग झालेले इस्वाटिनीचे पंतप्रधान एम्बरोसे डलामिनी यांना १ डिसेंबर रोजी चांगल्या उपचारांसाठी दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधानांची प्रकृती चांगली होती. तसेच ते योग्य प्रकारे प्रतिक्रिया देत होते.इस्वाटिनी हा आफ्रिका खंडातील छोटा देश आहे. हा देश दक्षिण आफ्रिकेने वेढलेला आहे. सुमारे १२ लाख लोकसंख्या असलेल्या या देशात आतापर्यंत सहा हजार ७६८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १२७ जणांचा मृत्यू झाला आहे.एम्बरोसे डलामिनी यांना २०१८ मध्ये इस्वाटिनीचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यापूर्वी ते एका कंपनीत सीईओ म्हणून काम करत होते. इस्वाटिनी बँकिंग सेक्टरमध्ये त्यांनी १८ वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ते इस्वाटिनी नेडबँकचे व्यवस्थापकीय संचालकही राहिले आहेत.