वॉश्गिंटन – जागतिक महामारी कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव जगभरात वाढत आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी विकसनशील देश इतर देशांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण या कठीण काळातही चीन व्यापारी वृत्ती खेळण्यापासून परावृत्त होत नाही. ब्रिटेन मॅगझिन 'द स्पॅक्टेटर' च्या म्हणण्यानुसार, जेव्हा चीनमध्ये कोरोना वेगाने पसरत होता, तेव्हा इटलीने चीनच्या मदतीसाठी हात पुढे केला होता.
इटलीने चीनला वैयक्तिक संरक्षित उपकरणे (पीपीई किट) दान केले होते. मात्र आता जेव्हा इटलीला पीपीईची नितांत गरज आहे, तेव्हा चीन दानमध्ये घेतलेले तीच उपकरणं इटलीला विकत आहे. वुहानपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फटका युरोपात इटलीला सर्वाधिक बसला आहे. कोविड -१९ मुळे सुमारे १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील डॉक्टर आणि परिचारिकांना सर्वात जास्त कोरोना संकटाचा सामना करावा लागत आहे.
द स्पॅक्टेटरच्या मते, या संकटाच्या काळात चीनने मानवतेचा मुखवटा घालून इटलीला पीपीई किट दान देणार असल्याचं जगाला दाखवून दिले. पण चीनचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कित्येक अहवालातून चीन पीपीई किट दान दिले नसून ते विकल्याचं सांगितलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्याने एका मासिकाचा हवाला देत सांगितले की, चीन हा इटली आणि विकसनशील देशांना मदत करण्याचं नाटक करीत आहे.
कोरोना विषाणूची पहिली घटना मागील वर्षी चीनच्या वुहानमध्ये झाली होती, त्यानंतर हा व्हायरस हळूहळू जगातील अन्य देशातील लोकांना संक्रमित करत आहे. अशा परिस्थितीत चीनने नक्कीच मदत केली पाहिजे. चीनने इतर देशांना पुरविलेल्या साहित्यामध्ये कमतरता असल्याचं दिसून आले आहे. या कारणास्तव स्पेनने चीनला ५० हजार कोरोना टेस्टिंग किट परत केली आहेत असा आरोप अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
तसेच नेदरलँड्सनेही तक्रार केली आहे की चीनने पाठविलेले निम्मे मास्क सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य नाहीत. चीनचं हे पाऊल अत्यंत घाणेरडे आहे. इटलीने त्यांना दिलेले पीपीई किट विकत घेण्यास चीनने इटलीला भाग पाडले. इटलीने युरोपमध्ये कोरोना संसर्ग होण्यापूर्वी चीनच्या लोकांना मदत करण्यासाठी अनेक टन पीपीई पाठविले होते असं ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.