चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत.
कोरोना हा व्हायरस किंवा विषाणूजन्य आजार चीनच्या हुबेई प्रांतात वुहान या शहरात आढळून आला. डिसेंबर 2019 पासून त्याची लागण वुहानमधील लोकांमध्ये पसरली. तेथे आजारी पडलेल्यांमध्ये न्यूमेनियासारखी, पण तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसून आली. त्याच्यावर नेहमीचे उपचार लागू पडत नाही यावरुन हा वेगळा नवा असल्याचे निदान करण्यात आले. या नवीन विषाणूबद्दल फारसे माहिती नसल्यामुळे आरोग्य तज्ज्ञ या परिस्थितीचे बारकाईने निरिक्षण करीत आहेत. तसेच या आजाराची लक्षणं आढळल्यानंतर या विषाणूमुळे गंभीर स्वरुपाच्या रोगाची साथ पसरण्याची शक्यता वाटल्याने तसा इशारा देखील देण्यात आला होता.
देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून देशातील विविध राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. एकीकडे संपूर्ण देशातील रेल्वे वाहतूक थांबवलेली आहे, तर अनेक भागात दैनंदिन व्यवहारांवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र असे असूनही लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान फिलिपिन्समधून आलेल्या प्रवाशाचा कोरोनामुळे आज मृत्यू झाला आहे. मुंबईतला हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेला हा आठवा रुग्ण आहे. गेल्या 24 तासांत 15 नव्या संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईत 14, पुण्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 89वर पोहोचली आहे.