कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असं असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 235,101,076 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,806,246 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे.
अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला असून जवळपास सात लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत मृतांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असताना देखील अमेरिकेत कोट्यवधी लोकांनी अजून कोरोनाची लस घेतलेली नाही. यामुळेच लस न घेतलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. तब्बल सात कोटी लोकांनी लस घेतलेली नाही. रुग्णालयातील रुग्णांचा आकडा कमी होत आहे. पण मृतांच्या संख्येने चिंता वाढवली आहे.
अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप
रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जवळपास आता 75 हजार आहे. तर याआधी सप्टेंबरच्या सुरुवातीला ती 93 हजार होती. रुग्णांची संख्या कमी होण्यासाठी मास्क लावणे आणि लस घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे. डेल्टा व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळालं. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत होता. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागला.
मुलांमध्ये वेगाने कोरोनाचा संसर्ग
कोरोनाचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याची माहिती आता समोर आली आहे. अमेरिकेत शाळा सुरू करण्यात आल्यामुळे मुलांमध्ये वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने चिमुकल्यांवर सध्या उपचार सुरू आहेत. फ्लोरिडामध्ये अत्यंत भीषण परिस्थिती आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडा हे कोरोनाचं हॉटस्पॉट झालं आहे. न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, मध्य फ्लोरिडामध्ये कोरोनामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.