जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 30 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाने आतापर्यंत 55 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. याच दरम्यान चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. याच दरम्यान आता चीनने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या आधी तियानजिन शहरामधील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
तियानजिन शहरामध्ये तब्बल एक कोटी 40 लाख लोक राहतात. या सर्वांच्या कोरोना चाचण्या केल्या जाणार असल्याचं म्हटलं आहे. या शहरामध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळले असून यामध्ये ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांचाही समावेश असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तियानजिन आणि बीजिंग या दोन शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात लोक ये-जा करत असतात. हायस्पीड बुलेट ट्रेनमुळे या दोन शहरांमधील अंतर अवघ्या 30 मिनिटांवर आलं असल्याने रोजच्या कामांसाठीही अनेकजण या दोन शहरांदरम्यान प्रवास करत असतात.
20 जणांना कोरोनाची लागण
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शहरामध्ये 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतरच आता संपूर्ण शहराची कोरोना चाचणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शहरामधील कोरोना नियंत्रण आणि व्यवस्थापनासंदर्भात निर्माण करण्यात आलेल्या मुख्य केंद्रातून दिलेल्या माहितीनुसार संसर्ग झालेल्या व्यक्ती शुक्रवारी आणि शनिवारी जिनान जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या होत्या. हे लोक शहरामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन
चीनमधील एका शहरात कोरोनाचे फक्त तीन रुग्ण आढळले म्हणून जवळपास 10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लॉकडाऊन केलं आहे. या तिन्ही रुग्णांना कोणतीही लक्षणं पाहायला मिळत नाहीत. चीनच्या यूझूमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घराबाहेर न पडण्याची सूचना करण्यात आली आहे. या शहराची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे. गेल्या काही दिवसांत येथे तीन रुग्ण आढळल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी आणि उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनादेखील करण्यात आल्या आहेत.