कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. याच दरम्यान चीनवर आता गंभीर आरोप करण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या खूप जास्त आहे असा दावा एका विश्लेषकाने केला आहे. चीनने मृतांची खरी आकडेवारी लपवून ठेवली असून मृतांच्या संख्येपेक्षा 17 हजार टक्के जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. चीनमधील कोरोना मृतांची संख्या तब्बल 17 लाख असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीजिंगचे म्हणणे आहे की येथे कोरोनामुळे 4,636 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जगातील सर्वात कडक लॉकडाऊन लागू असताना मृतांच्या आकडेवारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
द सनने दिलेल्या रिपोर्टनुसार, स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या क्वांटिटेटिव्ह फायनान्स प्रोग्रामचे संचालक जॉर्ज कॅलहॉन यांनी हा गंभीर आरोप केला आहे. चीनने आपली राजकीय प्रतिमा खराब होऊ नये म्हणून मृत्यूची आकडेवारी लपवली आहे. द इकॉनॉमिस्टने विकसित केलेल्या मॉडेलद्वारे जारी केलेल्या डेटाचा अभ्यास करणार्या तज्ञांनी द इपोच टाईम्सला सांगितले की चीनमधील अधिकृत आकडेवारी सांख्यिकीयदृष्ट्या अशक्य आहे. एप्रिल 2020 पासून बीजिंगमध्ये अधिकाऱ्यांनी फक्त दोन मृत्यूची नोंद केली आहे. अशा प्रकारे कोरोनामुळे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये चीनचे नाव समाविष्ट झाले.
जॉर्ज कॅलहॉन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हे असंभव आहे... हे वैद्यकीयदृष्ट्या अशक्य आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की 2020 मध्ये कोणतीही कोरोना लस नव्हती आणि उपचारही नव्हते. अशा परिस्थितीत, चीनमध्ये कोणत्याही संरक्षणाशिवाय लोकसंख्या जास्त होती, तरीही कोविड मृत्यू शून्य झाले आहेत, तर हजारो प्रकरणे येथे नोंदवली गेली आहेत. जॉन हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरच्या आकडेवारीनुसार, येथे 22 हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. द इकॉनॉमिस्टच्या मॉडेलवर आधारित कॅलहॉनचा दावा आहे की चीनची अधिकृत मृत्यूची संख्या सुमारे 17,000 टक्के कमी आहे.
चीनवर आकडेवारी लपविल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही
चीनवर आकडेवारी लपविल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या एका चीनी प्राध्यापकाने यापूर्वी कोरोना व्हायरसमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या कव्हर करण्याचा आग्रह धरला होता. चीनच्या एलिट सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये शिकवणाऱ्या कॅ जिया यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि देशातील कोरोना व्हायरसच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला. त्याच वेळी, वुहानमध्ये राहणाऱ्या लोकांनी देखील सूचित केले की महामारीच्या सुरुवातीस मृत्यूची आकडेवारी लपविली गेली होती. वुहान रहिवाशांचा असा विश्वास होता की मार्च 2020 पर्यंत येथे 42 हजार लोकांचा मृत्यू झाला होता, तर सरकारने सांगितलं की केवळ तीन ते चार हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.