जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 234,175,561 वर पोहोचली आहे. तर 4,790,376 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 210,980,038 लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर ते बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना केल्या जात आहेत. व्हायरसमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू असून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. काही देशांमध्ये प्राण्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनच्या हार्बिन शहरातील तीन पाळीव मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलत आहे. यामुळेच प्रशासनाने त्यांना मृत्यूची शिक्षा दिली आहे. 21 सप्टेंबरला तीन मांजरींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर मांजरींना अन्न-पाणी देऊन त्यांना आयसोलेशनमध्ये सोडण्यात आलं होतं. यानंतर एका सामाजिक कार्यकर्त्यांने तिन्ही मांजरींची पुन्हा कोरोना चाचणी केली.
चीनमध्ये तीन मांजरी कोरोना पॉझिटिव्ह
मांजरींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मांजरींना मारण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला. या प्रस्तावाला मांजरींच्या मालकाने विरोध दर्शवत ऑनलाईन अपिल केलं होतं. मात्र प्रशासनाने काही न ऐकता तिन्ही मांजरींना मारलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी "तिन्ही मांजरींना यासाठी मारलं कारण प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्यास उपचार उपलब्ध नाहीत. कोरोनाबाधित मांजरी, मालक आणि इमारतीत राहणाऱ्या अन्य लोकांसाठी धोकादायक ठरत होत्या" असं म्हटलं आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशनने प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी असल्याचं म्हटलं होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.