कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 44 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 448,199,677 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 6,027,582 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 382,376,008 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाचा वेग मंदावत असताना धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. Worldometers नुसार, 7 मार्च रोजी जगभरात 1215764 नवे रुग्ण सापडले. तर 4888 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, जर्मनी, रशिया, ब्रिटन आणि नेदरलँडमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. दक्षिण कोरियामध्ये सर्वाधिक म्हणजे दोन लाखांहून जास्त रुग्ण आढळून आले आहेत. व्हिएतनाम 147,358, जर्मनी 122,895, रशिया 73,162, नेदरलँड 64,441, जापान 55 हजार, यूके 42,040 आणि अमेरिकेमध्ये 25,751 रुग्ण आढळून आले आहेत. रशियामध्ये 688 लोकांचा मृत्यू झाला असून हा आकडा सर्वाधिक आहे. यानंतर अमेरिकेत 508 जणांचा मृत्य़ू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा वेगाने प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. चीनने जगाचं टेन्शन वाढवलं असून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. चिनी मीडियानुसार, महामारीच्या सुरुवातीस वुहानमध्ये उद्रेक झाल्यानंतर आता देशात एकाच दिवसात सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. चीनमध्ये कोरोनाचे 526 नवे रुग्ण आढळून आले आहे, जी गेल्या दोन वर्षांत एका दिवसात सर्वाधिक संसर्गाची संख्या आहे. त्यापैकी 214 रुग्णांमध्ये लक्षणं आहेत. तर 312 रुग्ण लक्षणे नसलेले होते. चीनने म्हटलं आहे की इतकी प्रकरणे म्हणजे कोविड शून्य धोरणाला मोठा धक्का आहे. त्याचबरोबर चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर इतर देशही सतर्क झाले असून त्यांनी नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
कोरोनाचा खतरनाक परिणाम; मेंदूत दिसताहेत भीतीदायक संकेत, रिसर्चमध्ये खुलासा
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रिसर्चनुसार, कोरोनाग्रस्त लोकांचा मेंदू आकुंचित म्हणजे छोटा होऊ लागला आहे. रिसर्चमधून धडकी भरवणारी माहिती मिळत आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, मेंदूचा पहिला एमआरआय आणि कोरोना झाल्यानंतरच्या एमआरआयमध्ये मोठा फरक आहे. ज्या लोकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती, त्यांच्या मेंदूचा आकारही हळूहळू कमी होऊ लागला आहे. सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे मेंदूचा आकार लहान होत असल्यामुळे मेंदूतील ग्रे मॅटर कमी होत आहे. ग्रे मॅटरमुळे माणसाची स्मरणशक्ती तयार होते. हे गंध ओळखण्याशी देखील थेट संबंधित आहे. कोरोनानंतर मेंदूमध्ये झालेला हा बदल कायमस्वरूपी आहे की नाही हे अद्याप संशोधकांना माहीत नसले तरी मेंदू स्वतःला बरा करण्यात पटाईत आहे यावर त्यांनी भर दिला. यावर दीर्घकाळ संशोधन झाल्यावरच याबाबत अधिक माहिती मिळू शकेल.