जगभरात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 29 कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ही 293,005,573 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 5,466,034 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 255,427,243 जणांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याच दरम्यान कोरोनापुढे अमेरिकेसारखा प्रगत देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही कोरोना रुग्णांचा आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
अमेरिकेत आता पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल 10 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाची त्सुनामी आल्याचं म्हटलं जात आहे. आकडेवारीनुसार, सोमवारी दिवसभरात अमेरिकेत तब्बल 10,03,043 नागरिक कोरोनाबाधित आढळून आले. अत्यंत वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे सध्या अमेरिकेत रुग्णसंख्येने रेकॉर्ड मोडला आहे. ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे. दोन वर्षांपूर्वी महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत नोंदवला गेलेला हा उच्चांक आहे.
शाळा आणि कार्यालये बंद, रुग्णालयांवरील ताणही वाढला
सोमवारी अमेरिकेत आढळलेली रूग्ण संख्या ही केवळ चार दिवसांपूर्वी आढळलेल्या रूग्ण संख्येच्या दुप्पट असल्याचं देखील दिसून आलं आहे. चार दिवसांपूर्वी अमेरिकेत 5 लाख 90 हजारांच्या आसपास रूग्ण आढळल्याचे समोर आले होते. सोमवारी अमेरिकेतील दैनंदिन प्रकरणांची संख्या इतर कोणत्याही देशात पाहिल्या गेलेल्या संख्येपेक्षा दुप्पट होती. सध्या वाढत्या संसर्गामुळे विमानाची उड्डाणे रद्द झाली आहेत. शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रुग्णालयांवरील ताणही वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाचा विस्फोट! दर 1 सेकंदाला 2 जण पॉझिटिव्ह
फ्रान्समध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. येथे एका दिवसात 2 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महामारीची सुरुवात झाल्यापासून, फ्रान्समध्ये एका दिवसात इतके रुग्ण कधीच आढळले नव्हते. सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 208,000 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. युरोपमधील साथीच्या आजारादरम्यान नोंदवल्या रुग्णसंख्येपेक्षा ही दैनंदिन संख्या सर्वाधिक आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, याबाबत माहिती देताना फ्रान्सचे आरोग्य मंत्री ओलिवियर वेरन यांनी परिस्थिती बिघडत चालली आहे. यापूर्वी, फ्रान्समध्ये एका दिवसात 180,000 प्रकरणे आढळून आली होती आणि आताच्या आकडेवारीने हा विक्रमही मोडल्याचं म्हटलं आहे