कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरात पसरलेल्या या कोरोना महामारीचा शेवट अद्याप होताना दिसत नाही. आपल्याला आणखी किती काळ मास्क घालावे लागतील आणि खबरदारी घ्यावी लागेल हे सध्या सांगता येणं फार कठीण आहे. पण आयुष्यभर मास्क घालावे लागणार नाही आणि लवकरच या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळवता येईल असं आता तज्ज्ञांनी म्हटलं आहे. इकोनॉमिक फोरमला संबोधित करताना, अमेरिकेतील महामारीशास्त्रज्ञ एंथनी फाउची यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.
कोरोना महामारी लवकर संपणार नाही. ओमाक्रॉन हे त्याचे शेवटचे स्वरूप असणार नाही असं फाउची यांनी म्हटलं आहे. यासोबतच कोरोनामुळे लोकांना नेहमी मास्क वापरावे लागण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या ऑनलाईन दावोस अजेंडा कॉन्फरन्समध्ये, फाउची यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या सद्य परिस्थितीबद्दल त्यांचे विचार शेअर केले आहेत. कोरोना व्हायरसचे पुढे काय होईल हे सांगणे कठीण आहे, परंतु हे निश्चित आहे की सर्व देशांच्या प्रयत्नांनी यावर नियंत्रण मिळवले जाईल. कोविड-19 चे ओमायक्रॉन स्वरूप अत्यंत वेगाने पसरते, परंतु त्यामुळे फार गंभीर स्थिती निर्माण होत नाही.
"साथ किती काळ चालू राहील हे सांगणे कठीण"
येणाऱ्या काळात व्हायरसच्या नवीन प्रकारांवर बरेच काही अवलंबून असेल. या साथीच्या आजाराबाबत अनेक प्रकारची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे, परंतु ही साथ किती काळ चालू राहील हे सांगणे कठीण आहे असं देखील एंथनी यांनी सांगितलं आहे. तसेच एकदा परिस्थिती पूर्वपदावर आली की, महामारीचा आपल्यावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपल्या आठवणींमध्ये राहील. त्याच वेळी, लंडनमधील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ एनेलाइज वाइल्डर स्मिथ यांनी ओमायक्रॉननंतरही या विषाणूचे नवीन प्रकार दिसू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन जगातील सर्व देशांनी भविष्याची तयारी करायला हवी असं म्हटलं आहे.
"ओमायक्रॉन हा प्रकार फारसा जीवघेणा नाही"
एंथना फाउची यांनी सध्या ओमायक्रॉन हा प्रकार फारसा जीवघेणा नाही आणि हीच परिस्थिती कायम राहिल्यास काळजी करण्यासारखे काहीच नाही. पण भविष्यात आणखी काही प्रकार आहेत का आणि ते आले तर त्यांचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 8,891 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.