कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 19 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक असून कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे.
कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतरांपेक्षा अधिक गंभीर आहे. कांजण्यांप्रमाणे तो पसरत आहे. अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्याअंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या व्हायरसचा प्रसार केला जाऊ शकतो, असं सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे लसीकरण घेतलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे. द वॉशिंग्टन पोस्टने देखील याबाबतचं वृत्त दिलं आहे.
रिपोर्टनुसार, डेल्टा व्हायरसचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या व्हायरसचा प्रसार करू शकतात. पण प्रत्येक वेळी असंच घडेल, हे मात्र नक्की नाही. डेल्टा व्हेरिएंट हा मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू सारखा वेगानं पसरतो. हा व्हायरस कांजण्यांसारखाच संसर्गजन्य असल्याचं वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असं म्हटलं आहे.
कोरोना लसीकरणाचा वेग वाढला नाही तर जीवघेणा होऊ शकतो Delta Variant; WHO चा धोक्याचा इशारा
डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असं देखील WHO ने म्हटलं आहे. लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणं गरजेचं आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. त्यामुळेच सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी 10 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करणं गरजेचं आहे असं आवाहन WHO ने केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी याबाबत भाष्य केलं आहे. आतापर्यंत, चार चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यांत सरासरी संसर्ग 80 टक्क्यांनी वाढला आहे असं टेड्रॉस यांनी म्हटलं आहे.