कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वांचंच टेन्शन वाढलं आहे. अनेक प्रगत देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने 21 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 217,901,675 वर पोहोचली आहे. तर 4,523,766 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जगभरात संशोधन सुरू असून त्यातून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. कोरोना लस घेतल्यावरही मोठा धोका असल्याचा खुलासा रिसर्चमधून करण्यात आला आहे.
वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट वेगाने पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. या विषाणूच्या व्हेरिएंटला C.1.2 असं नाव देण्यात आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हेरिएंटने प्रभावित लोकांची संख्या वाढत आहे. मे महिन्यात सर्वप्रथम हा व्हेरिएंट पाहण्यात आला. त्यानंतर आता नवा व्हेरिएंट चीन, कांगो, मॉरिशस, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंडमध्ये आढळून आला आहे. नव्या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. C.1 च्या तुलनेत नवा व्हेरिएंट म्यूटेट आहे. रिसर्चमध्ये दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत C.1 व्हेरिएंट आढलून आला होता. तो आता म्युटेट होऊन C.1.2 झाला आहे. आफ्रिकेत गेल्या वर्षी आढळून आलेले व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकी व्हेरिएंटच्या नावाने ओळखले जात होते. मात्र नंतर जागतिक आरोग्य संघटनेने यांच नामकरण केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा विस्फोट! प्रगत अमेरिकाही हतबल, ऑक्सिजनची मोठी कमतरता; मुलांमध्ये संसर्गाचा धोका
अमेरिकेत कोरोनाचं घातक रुप पाहायला मिळत आहे. अनेक राज्यातील रुग्णालयात बेड आणि स्टाफची कमतरता होती. मात्र आता ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि लुईसियानासारख्या राज्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. डोना क्रॉस यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण ऑक्सिजन टँक हे 90 टक्के भरले जातात. जेव्हा टँकमध्ये 40 ते 50 टक्के ऑक्सिजन शिल्लक असतो तेव्हा तो टँक पुन्हा भरला जातो. मात्र आता 10 ते 20 टक्के ऑक्सिजन शिल्लक राहिल्यावर तो भरण्यात येत आहे.