जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना रोमानियामध्ये घडली आहे. कोरोना रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सात रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रोमानियाच्या कोन्स्तांता शहरातील एका रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये अचानक आग लागली.
रोमानियाचे गृहमंत्री लुसियन बोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला चुकून नऊ जणांचा मृत्यू झाला असं सांगण्यात आलं पण यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात 113 रुग्णांवर उपचार सुरू असताना ही आग लागली. त्यानंतर सर्व रुग्णांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात आले आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. राष्ट्रपती क्लाउस इओहानिस यांनी आरोग्य यंत्रणेवर कोरोना महामारीमुळे खूप ताण आला आहे. तसेच लोकांचं रक्षण करण्यातही अयशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.
रोमानियामध्ये कोरोनाचा कहर
रोमानियामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णालयात उपचारासाठी भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. याआधी देखील वर्षभरात दोन रुग्णालयाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला असून रुग्णांची संख्या 235,101,076 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4,806,246 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.