जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही 204,626,055 वर पोहोचली आहे. तर 4,323,778 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देशही या महाभयंकर संकटापुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान ऑस्ट्रेलियासह अनेक शहरात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
ऑस्ट्रेलियात सध्या कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठं शहर असलेल्या सिडनी व मेलबर्नमध्ये परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येथे कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सिडनीमध्ये गेल्या 24 तासांत 239 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मेलबर्नमध्ये 19 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही सर्वाधिक असून मृतांच्या आकड्याने देखील चिंता वाढवली आहे.
अमेरिकेनंतर आता सर्वात जास्त रुग्ण हे भारतात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग मंदावताना पाहायला मिळत आहे. मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 41,195 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मास्क, सोशल डिस्ंटसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टेन्शन वाढलं! अमेरिका-ब्रिटनमध्ये चिमुकल्यांमधील कोरोना संसर्गात वाढ; भारतासाठी धोक्याचा इशारा
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे. लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अमेरिकेतील अल्बामा, अरकंसास, लुसियाना आणि फ्लोरिडामध्ये 18 वर्षाखालील मुलांमधील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. अरकंसासमधील लहान मुलांच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत 50 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सात नवजात बालके अतिदक्षता विभागात असून दोन व्हेंटिलेटवर असल्याची माहिती मिळत आहे. लुसियानामध्ये जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वाधिक 4232 मुलांना बाधा झाल्याचे समोर आले. या ठिकाणी 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान पाच वर्षाखालील 66 मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळला आहे.