जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेक देशात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 20 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान इराणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात कोरोनाच्या पाचव्या लाटेच थैमान पाहायला मिळत आहे. दररोज 600 जणांचा मृत्यू होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने रुग्णालयात देखील जागा कमी पडत आहे. ऑक्सिजनची मोठी कमतरता जाणवत आहे.
रुग्णालयाच्या जमिनीवर आणि पार्किंगमध्ये रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. बेड मिळत नसल्याने लोक रुग्णालयाबाहेर खासगी वाहनं उभी करून आपल्या रुग्णांवर उपचार करत आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. दररोज तब्बल 40 हजारांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर 600 जणांचा मृत्यू होत आहे. इराणच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशामध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने प्रशासनच्या चिंतेत भर पडली आहे.
इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दर 2 मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे. तर कोरोना लसीचा देखील मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. इराण सरकारनेच याबाबत माहिती दिली आहे. इराणच्या प्रशासनाने कोरोनाचा कहर वाढण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन न करणं आणि मास्क न लावणे या गोष्टींना जबाबदार धरलं आहे. देशातील अनेक शहरांतील रुग्णालयामध्ये बेडची मोठी कमतरता आहे. सोशल मीडियावर लोक सरकार आणि लसीकरण यावरून जोरदार निशाणा साधत आहेत.
इराणच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, दर 2 सेकंदाला एका व्यक्तीला कोरोनाची लागण होत आहे. तर दर दोन मिनिटाला एकाचा मृत्यू होत आहे. रुग्णालयात बेडच शिल्लक नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. इराणच्या 31 प्रांतामधील अनेक भागांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या रुग्णसंख्येने आणि मृतांच्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.