कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 56 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 567,275,561वर पोहोचली आहे. तर 6,387,063 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला असून देश सध्या सातव्या लाटेशी झुंज देत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी कोरोना संसर्गाच्या नवीन रुग्णांच्या आकडेवारीने विक्रम केला आहे.
जिजी न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार, 24 तासांत 1,10,000 नवे संक्रमित आढळले आहेत. कोरोनाच्या सातव्या लाटेचा सामना करत असताना जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी गुरुवारी देशातील जनतेला साथीच्या आजाराबाबत जास्तीत जास्त खबरदारी घेण्याचे आवाहन केले. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिंएंटमुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे असं म्हटलं आहे. डब्ल्यूएचओनेही चिंता व्यक्त केली की आता अनेक देश कोरोनाबाबत हलगर्जीरपणा करत आहे.
जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाला आहे. काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेली परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. बदलत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेपासून सावध राहा असं WHO नं आवाहन केले आहे.
WHO चे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आता आपल्याला कोरोनाच्या नव्या लाटेसाठी सज्ज राहावं लागणार आहे. जे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्याचे प्रत्येकाचे स्वरुप बदललेले आहे. जास्त वेगाने संक्रमित होताना पाहायला मिळत आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात संक्रमित रुग्णांची संख्या वाढेल तितके रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन प्रत्येक देशाने त्यांच्याकडे एक एक्शन प्लॅन तयार ठेवायला हवा अशी सूचना त्यांनी केली आहे.