जगभरात कोरोनाचा हाहकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 60 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात कोरोनाने आतापर्यंत 64 लाख लोकांचा बळी गेला आहे. तर 60 कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या 600,021,122 आहे.
जपानमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. देश कोरोनाच्या सातव्य़ा लाटेचा सामना करत आहे. जपानमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून एका दिवसात तब्बल अडीच लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारी 2,61,029 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, सलग दुसऱ्या दिवशी हा विक्रमी उच्चांक गाठला आहे. यापूर्वी गुरुवारी 2,55,534 कोरोना प्रकरणे नोंदवली गेली होती. देशातील 47 पैकी 19 प्रांतांमध्ये दैनंदिन संसर्गामध्ये विक्रमी वाढ दिसून आली.
होक्काइडोमधील 8632, नागासाकीमध्ये 4611, मियागीमध्ये 4567, हिरोशिमामध्ये 8775 आणि फुकुओकामधील 15726 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गंभीर लक्षणांसह रुग्णालयात दाखल झालेल्या संक्रमित लोकांची संख्या गुरुवारपासून वाढली आहे, तर 294 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारने 27676 नवीन प्रकरणे नोंदवली. तर राजधानीत कोरोनामुळे 28 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
स्थानिक मीडिया क्योडो न्यूजने जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणू संसर्गावरील साप्ताहिक अपडेटचा हवाला देऊन म्हटले आहे की जपानमध्ये 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट या आठवड्यात 1395301 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया आणि अमेरिकेचा क्रमांक लागतो. जगभरात कोरोनाने थैमान घातले असून अनेक प्रगत देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.