कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत असून तब्बल 40 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. अशातच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. एकदा जरी रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. पण अशातच काही लोकांना पुन्हा पुन्हा कोरोनाची लागण होत आहे. याच दरम्यान एका व्यक्तीला एकदा, दोनदा नाही तर तब्बल 78 वेळा कोरोना झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तुर्कस्तानातील एक व्यक्ती गेल्या 14 महिन्यांत 78 वेळा कोरोना पॉझिटिव्ह झाली आहे. वर्षभरापासून तो आयसोलेशनमध्येच आहे. 56 वर्षीय मुझफ्फर कायासन यांना नोव्हेंबर 2020 साली पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. काही दिवसांनी त्याच्यातील कोरोना लक्षणं कमी झाली. पण जेव्हा पुन्हा कोरोना टेस्ट केली तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला नाही. 78 वेळा त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण प्रत्येक वेळेला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्हच येत आहे.
"रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्याने ते कोरोना लसही घेऊ शकले नाहीत"
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा ते आयसोलेशनमध्ये जातात. यामुळे त्याचं सामाजिक आयुष्यच संपलं आहे. ते आपल्या मित्रमैत्रिणींना भेटू शकतं नाहीत. तसेच कुटुंबासोबत देखील वेळ घालवू शकत नाहीत. खिडकीतून ते आपल्या कुटुंबासोबत थोडाफार संवाद साधतात. पण आपल्या प्रिय व्यक्तींना आपण स्पर्श करू शकत नाही, त्यांना प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही, याचं सर्वात जास्त दुःख त्यांना होत आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येत नसल्याने ते कोरोना लसही घेऊ शकले नाहीत.
"कायासनच्या रक्तातील कोरोना व्हायरस नष्ट होत नाही"
कायासन यांना ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. ज्यामध्ये आजारांशी लढणाऱ्या व्हाइड ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी कमी होतात आणि रुग्णाची इम्युनिटी खूप कमी होते. डॉक्टरांनी सांगितलं यामुळेच कायासनच्या रक्तातील कोरोना व्हायरस नष्ट होत नाही आहे. त्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी औषध दिलं जात आहे. पण ही प्रक्रिया संथ आणि खूप मोठी आहे. जगातील हे असं पहिलं प्रकरण आहे, ज्यामध्ये रुग्ण इतक्या कालावधीपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.